प्रेरणा: सफाई कामगारांचा सन्मान

दत्तात्रय आंबुलकर

“इसिस दल’ या कन्नड शब्दाचा मराठीतील भाषांतरित अर्थ म्हणजे पर्यावरणाचे पाईक. कचरा वेचणाऱ्या महिला, सफाई कामगार यांच्या कामाचे महत्त्व वादातीत आहे. ते स्वच्छतेचे, पर्यावरणाचे पाईक आहेत. पण या समुदायाला योग्य तो सन्मान तर दूर, त्यांना साधी सुरक्षाही मिळत नाही. त्यांच्या घरात मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. ही स्थिती बंगळुरूच्या नलिनी शेखर यांना दुःखी करत होती. यातूनच शहराच्या स्वच्छतेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांसाठी काम करण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली.

शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. हे लोक झाडूने रस्ता झाडतात, घरातला कचरा गोळा करतात. त्यांनी काही दिवस रजा घेतली तर साऱ्या परिसरात कचरा साचला जातो. एवढं असूनही त्यांच्या या कामाचे मोल कुणाच्या लक्षात येत नाही. समाजाचा हा घटक सदा उपेक्षितच राहतो. असे असंख्य अनोळखी चेहरे आपल्यासाठी झटत असतात व कुणी त्याची नोंदसुद्धा घेत नाही. नलिनी यांच्या लक्षात आले की सफाई कामगारांचे काम रोजंदारीवर चालणारे असते. समाजातील ही दरी कमी करण्यासाठी नलिनी यांनी “इसिस दल’ या सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. 2011 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या संस्थेतर्फे कचरा वेचणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष काम करण्यात येते. आजवर संस्थेने 10 हजार सफाई कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. आज दर आठवड्याला 4 हजार सफाई कामगारांची वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतात.

नलिनी यांच्या या साऱ्या प्रयत्नांची पूर्वपीठिका म्हणजे कचरा व्यवस्थापनाचे नियम अस्तित्वात येण्याआधीपासूनच त्या कचरा वेचणाऱ्यांसोबत काम करायच्या. घनकचरा व्यवस्थापनाविषयी कायदा येण्याच्या 7 वर्षे आधी म्हणजे 1993 मध्ये त्यांनी कचऱ्याच्या विभागणीबाबत सफाई कामगारांशी संवाद साधला होता. लग्नानंतर काही काळ त्या पुण्याला वास्तव्यास होत्या. त्यावेळी पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात प्राध्यापिका होत्या. सफाई काम करणाऱ्या कामगारांची मुले त्यांच्या बालपणापासून आपल्या आई-बाबांप्रमाणेच सफाई काम करतात ही बाब लक्षात आल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नलिनी शेखर यांनी कंबर कसली. त्यांची “इसिस दल’ ही संस्था सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत असते.

त्यांच्या व त्यांच्या संस्थेच्या प्रयत्नांमुळेच बंगळुरू महानगरपालिकेने स्वच्छता कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिक्षणानंतर सफाई कामगार आणि त्यांच्या पुढच्या पिढीने केवळ शिक्षितच न राहता स्वावलंबी राहावे, त्यांना कौशल्यासह उद्योजकतेचे धडे मिळावेत यासाठी आता बंगळुरूमध्ये प्रयत्न सुरू आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×