लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील १८९ वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला असून येत्या ४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.
अमृतांजन पुलाच्या खालून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जातो. पुलामुळे मार्गावर वळण आले असून, हा रस्ता अरुंद झाला आहे. या कारणाने याठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने हा पूल वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. त्यामुळे २०१७ पासूनच अमृतांजन पूल पडण्याच्या हालचाली ‘एमएसआरडीसी’ने सुरू केल्या होत्या. मात्र द्रुतगती मार्गावर असलेल्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे हे शक्य होत न्हवते.
परंतु सध्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी मुळे या मार्गावर वाहतूक अत्यंत तुरळक आहे. याचा फायदा घेत येत्या ४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान, हा पूल पाडण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांना अवगत करुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने परवानगी घेतली आहे. नियंत्रीत स्फोटकांचा वापर करुन सदर पुल पाडण्यात येणार आहे.
या कालावधी दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजुला जाणारी वाहतूक किमी ४४ अंडा पाँईट येथून खंडाळा व लोणावळा शहरातून बाहेर काढण्यात येणार आहे तर मुंबई दिशेकडे जाणारी वाहतूक किमी ५५ लोणावळा एक्झिट येथून खाली उतरवत लोणावळा व खंडाळा शहरातून अंडा पाँईट येथे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे द्रुतगती मार्गावरील दहा किलोमीटर अंतराची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.