पुणे, प्रभात वृत्तसेवा} – जो पन्हाळा किल्ला चाळीस हजार फौज घेऊन चार महिने प्रयत्न करुनही सिद्दी जौहरला जिंकता आला नाही, तो अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जंद यांनी जिंकून दाखवला.
ही जगाच्या इतिहासातील अद्भूत घटना होती. या विषयावर समकालीन कवी जयराम पिंड्ये यांनी “पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ हा काव्यग्रंथ लिहिला होता. या पराक्रमाचा इतिहास पुणेकरांना पाहायला मिळणार आहे, अशी माहिती इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
चाळीस फुटांची भव्य प्रतिकृती, अभ्यासपूर्ण निवेदन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, हजारो दिव्यातून उलगडत जाणारी युद्धकथा या वैशिष्ट्यांमुळे हे प्रदर्शन लोकप्रिय झाले आहे. इतिहास प्रेमी मंडळ मागील १९ वर्षे दिवाळी किल्ला दृकश्राव्य प्रदर्शन भरवत आहे.
प्रदर्शन दिनांक दि. २ ते १० नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते १० या वेळेत शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा, रमणबागे जवळ आयोजित करण्यात आले आहे. निवृत्त ब्रिगेडियर शरद लुकतुके यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, संत तुकारामांचे वारसदार शिरीष महाराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी इतिहास विषयक ग्रंथांचे भव्य विक्री केंद्र ही असणार आहे.