ढाका – वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावापासून वर्चस्व गाजवणाऱ्या बांगलादेशने सामन्याची सुत्रे सगळी आपल्या हातात ठेवली होती. विंडीजसमोर त्यांनी 395 धावांचे आव्हान ठेवलेल होते. प्रमुख खेळाडूंच्या माघारीमुळे विंडीजने दुसऱ्या फळीचा संघ या दौऱ्यासाठी पाठवला होता. पण, याच संघाने त्यांच्या जुन्या धडाकेबाज शैलीची आठवण करून देत एक असामान्य विजयाला गवसणी घातली.
या विजयाचा शिल्पकार मधल्या फळीतील फलंदाज काईल मेयर्स ठरला. त्याने कसोटी पदार्पणातच नाबाद द्विशतकी खेळी करताना वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटीत बांगलादेशावर तीन गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
बांगलादेशाने आपला दुसरा डाव 8 बाद 223 धावसंख्येवर घोषित करून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 395 धावांचे आव्हान ठेवले होते. कसोटी इतिहासात विंडीजने पाचव्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळविला.
अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना मेयर्सला एन्क्रुमा बॉनर (86) याची सुरेख साथ मिळाली. या जोडीने 216 धावांची भागीदारी करताना सामन्याचे चित्रच पालटवले. फिरकी गोलंदाज नईम रहसन याच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत क्रेग ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या फळीच्या वेस्ट इंडिज संघाने विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज 259. व 7 बाद 395 धावा. (मेयर्स नाबाद 210, बॉनर 86, मिराज 4-113) वि. वि. बांगलादेश 430 धावा. व 8 बाद 223 घोषित. (मोमिनुल हक 115, दास 69, वॅरिकन 3-57, कॉर्नवॉल 3-81).