पारनेरमध्ये औटी विरुद्ध लंके यांची ऐतिहासिक लढत 

शशिकांत भालेकर
पारनेर – पारनेर विधानसभेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. आज जाहीर प्रचार संपला आहे. उद्या (दि.21) मतदान होत आहे. उमेदवारांचा शेवटपर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा व आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे. तालुक्‍यातील राजकीय वातावरण या निवडणुकीमध्ये गरमागरम राहिले आहे. गेल्या दोन पंचवार्षिक नंतर पुन्हा दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे आ. विजय औटी व राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांच्यात चुरस पहालया मिळत आहे.
निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला असून, मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला.

पारनेर तालुक्‍याचा राजकीय इतिहास पाहिला, तर सुरुवातीच्या काळात येथे कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. त्यामुळे तालुक्‍यातून पहिला आमदार हा कम्युनिस्ट पक्षाचा होता. अद्यापही कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते या तालुक्‍यात आहेत. मात्र कालांतराने तालुक्‍यातील आमदार इतर पक्षांचे होत गेले. त्यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांना तालुक्‍याने स्वीकारले. स्वातंत्र्यानंतर 1952 साली पहिली निवडणूक झाली. 1952 ते 62 या काळात तालुक्‍यावर कम्युनिस्ट पक्षाची पकड होती. 10 वर्षे कै. भास्कराव औटी हे पक्षाचे आमदार होते. त्या काळात कम्युनिस्ट विचारसरणीचे अधिक वर्चस्व होते. त्यामुळे पुढील अनेक वर्षे ही विचारसरणी तालुक्‍यात राहिली व ती आजतागायत आहे.

1962 ला कॉंग्रेसकडून कै. बाळासाहेब भगत आमदार झाले व कॉंग्रेस पक्षाने कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडीत काढीत तालुक्‍यात आमदारकी मिळवली. भगत पाच वर्षे आमदार राहिले. त्यानंतर 67 ला कै. साहेबराव गुंजाळ कॉंग्रेस कडूनच आमदार झाले. ते देखील पाच वर्ष आमदार राहिले. मात्र 1972 ला तालुक्‍यात कॉंग्रेसला उमेदवार आयात करावा लागला. कोपरगावचे कै. शंकरराव काळे पारनेर मतदारसंघातून आमदार झाले. ते देखील 7 वर्षे आमदार राहिले. कम्युनिस्टांचा प्रभाव तालुक्‍यावर होताच. म्हणून पुन्हा 1980 ला कै. बाबासाहेब ठुबे कम्युनिस्ट पक्षाकडून आमदार झाले. जवळपास 18 वर्षांनी पुन्हा औटी यांच्यानंतर ठुबे यांच्या रूपाने कम्युनिस्ट तालुक्‍यात सत्तेवर आले.

कॉंग्रेसने पुन्हा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला.1985 ला नंदकुमार झावरे कॉंग्रेसकडून आमदार झाले. ते सलग दोनदा निवडून येत 10 वर्षे आमदार राहिले. ते विखे गटाचे समजले जात. 1995ला त्यांना कॉंग्रेसने तिकीट नाकारत कै. वसंतराव झावरे यांना दिले. अशा वेळी नंदकुमार झावरे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. वसंतराव झावरे 1999 पर्यंत ते आमदार होते. पुढे शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. कै. झावरे पवारांच्या बरोबर राहीले.

राष्ट्रवादीकडून ते सुमारे दहा वर्षे आमदार राहिले. 2004 ला कॉंग्रेसचे तत्कालीन जि. प. सदस्य विजय औटी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत कै. झावरे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. ते शिवसेनेकडून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी मात्र त्यांना लंके यांच्याशी कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. प्रस्थापितांविरोधात लढत असल्याचा प्रचार लंके करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये लंके बाजी मारून इतिहास घडवतात की औटी हे चौकार मारून इतिहास घडवतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.