ट्रम्प यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक अब्राहम करार

इस्रायल आणि आखती देशांमध्ये मैत्रीचे नवीन पर्व सुरू

वॉशिंग्टन – गेली अनेक दशके इस्रायल आणि आखाती देशांमध्ये कमालीचे शत्रुत्वाचे वातावरण होते. आता हे वातावरण नाहीसे करण्याचा महत्त्वाचा करार अमेरिकेच्या मध्यस्थीने झाला आहे.

या कराराला अब्राहम करार असे नाव देण्यात आले असून आज अध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेत्यानयाहू आणि संयुक्‍त अरब अमिरात तसेच बहरिनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या. व्हाईट हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला. 

यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अरब देश आणि इस्रायलमध्ये हे जे नवीन मैत्रीपर्व सुरू झाले आहे त्यातून मध्यपूर्वेत आता शांतता नांदणार आहे. 

यावेळी संयुक्‍त अरब अमिरातीचे विदेश मंत्री अब्दुल्ला बिन झायेद आणि बहरिनचे विदेश मंत्री अब्दुलतीफे अल झायनी हे उपस्थित होते. या करारामुळे त्या देशांतील लोकांना आता समद्धी आणि शांततेच्या वातावरणात राहता येणार आहे, असेही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले.

या आधी इजिप्तने आणि नंतर जॉर्डनने इस्रायलशी मैत्री करार केला आहे. आज दोन महत्त्वाचे अरब देश यात सामील झाले असून पुढील काळात आणखीही अरब देश यात सामील होतील, असा विश्‍वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

या कराराद्वारे इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि बहरिन हे देश एकमेकांच्या देशात आपला राजकीय दूतावास उघडतील आणि या देशांमध्ये आपसातील मैत्री संबंध तसेच व्यापारउदीमही वाढीला लागेल असे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.