ज्या बालेवाडीमध्ये इयत्ता चौथीच्या पुढे शाळा नव्हती आणि नंतरच्या काळात मुलींना सातवीनंतर शिक्षण सोडून देणे भाग पडत होते, त्या बालेवाडीमध्ये शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम गणपतराव बालवडकर यांच्या श्री खंडेराय प्रतिष्ठानने केले आहे. आपण शिकून आपला चरितार्थ चालवणे, यापेक्षा समाजातील सर्व घटकांना चरितार्थासाठी शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहाणे, या वाडवडिलांच्या संस्कारातूनच गणपतरावांनी आपले कार्य उभे केले आहे.
गणपतराव बालवडकर यांचा जन्म शेतकरी कुटुंबात बालेवाडी येथे झाला. त्यांचे घराणे वारकरी सांप्रदायातले असल्याने साहजिकच त्यांच्या कुटुंबाला अध्यात्मिक बैठक आहे. वडील म्हातोबा बालवडकर हे त्यांच्या मुलांना नेहमी सांगत असत की, ‘एकटा माणुस कोणीही पोट भरू शकतो परंतु समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत; कारण आपण समाजाचे ऋणी आहोत,’ ही त्यांची अनुकरणीय अशी शिकवण होती.
बालेवाडी गावात चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे गणपतराव बालवडकर यांनी बालेवाडी गावांत चौथीपर्यंतचेच शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना गावची मुळा नदी पोहुन पलीकडे चार ते पाव किलोमिटरवर असलेल्या पिंपळे निलख येथे जावे लागत होते. म्हणून गणपतराव बालवडकर यांनी चौथीनंतर शाळा सोडून सतत तीन वर्षे शेती केली. तीन वर्षानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण पिंपळे निलख येथे घेतले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (नाना वाडा) पुणे येथे आठवी ते अकरावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी आयटीआय औंध येथे वर्ष 1971-72 मध्ये मिलरचा कोर्स पूर्ण केला आणि किर्लोस्कर कमिन्स वर्ष 1972 मध्येच कामगार म्हणून सेवा रुजू केली.ात्यंत इमाने इतबारे स्वरुपात त्यांनी ही नोकरी तब्बल 34 वर्षे केली.
त्यादरम्यानच गणपतराव बालवडकर हे वर्ष 1984 मध्ये बालेवाडी गावचे सरपंच झाले. त्याकाळात बालेवाडी गावात डांबरी रस्ते, कार्पोरेशनचे पाणी, स्ट्रीट लाईट अशी अनेक लोकोपयोगी अशी महत्वाची कामे केली.
किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी करीत असतानाच वर्ष 1988 मध्ये त्यांनी “श्री खंडेराय प्रतिष्ठान’ या नावाने शैक्षणिक संस्था सुरू केली. त्याकाळात बालेवाडी गावातील मुलीना सातवीच्या पुढील शिक्षणासाठी औंध गांव किंवा शिवाजीनगर पुणे येथे जावे लागत असे. शाळेत जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. पावसाळयात गुडघाभर चिखल असायचा. त्यामुळे गावातील पालक मुलींना सातवीनंतर शिकवत नसत. ही बाब गणपतरावांच्या मनाला खूप सलत होती. म्हणून त्यांनी वर्ष 1989 च्या जून महिन्यात बालेवाडी गावातच, आपल्या राहत्या घरी मुलींचा पहिला वर्ग सुरू केला. त्या बॅचचा दहावीचा निकाल 98% लागला आणि त्यातून त्या सर्वच मुलींना पुढील शिक्षणाची प्रेरणा मिळाली.
सध्या श्री. खंडेराय प्रतिष्ठानचा विस्तार बालवर्ग ते एमबीएपर्यंतचा आहे. वर्ष 2014 पासून सीएम इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले असून सध्या तेथे 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
याशिवाय, गणपतराव बालवडकर यांना तीन मुली असून डॉ. सागर, सुदर्शन, स्वप्निल हे शिक्षण संस्थेत सहकार्य करतात. एसकेपी कॅम्पसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नवचैतन्य हास्य योग परिवार व नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केले असून त्याचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत.
या आहेत शिक्षण सुविधा…
- श्री. खंडेराय प्रतिष्ठानच्या माध्यमातुन
- पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय
- उच्च माध्यमिक महाविद्यालय
- बीबीए, बीसीए, बी. कॉम, बी. एड. डी एड.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र
- स्पोर्टस ऍकॅडमी
- संस्कार वर्ग
- तबला, हार्मोनियम वादन प्रशिक्षण