पुणे : राज्यात करोना रुग्णांची संख्या दररोज ४५ हजारांच्या पुढं गेली आहे. तर पुण्यातही रुग्णवाढीचा वेग राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र रुग्णसंख्या नवनवीन विक्रम करत आहे. शनिवारी जिल्ह्यात १० हजारांवर रुग्णसंख्या वाढली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात दिवसागणिक नवा रेकॉर्ड करत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात कडक निर्बंध आणले आहेत. तसेच लसीकरणाच्या मोहिमेचा वेग देखील वाढवला आहे. परंतु, शनिवारी जिल्ह्यात १० हजारांवर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ९ हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तर जवळपास ६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरात शुक्रवारी ४ हजार ६५३ तर पिंपरीत २ हजार ४६३ रुग्णांची भर पडली होती. तसेच पुणे शहरात ३ हजार ३३७ तर पिंपरीत १ हजार ५०७ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील शुक्रवारी एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजार ०९७ झाली आहे.