मावळ : काही दिवसापूर्वी पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावच्या हद्दीत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. द्रुतगती मार्ग ओलांडत असताना बिबट्याला एका अज्ञात वाहनाची ठोकर बसली व त्यातून सदर बिबट प्राणी गंभीर जखमी होऊन मृत पावला. या घटनेनंतर द्रुतगती मार्गावरील वाहनांचा वेग आणि वन्यप्राण्यांचा अधिवास हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांसाठी अडथळा नसल्याने सर्वच वाहने सुसाट वेगाने धावत असतात. काही वाहने वेगाची मर्यादा ओलांडून धावत असतात. यातून आवश्यकता असेल तेव्हा वेग कमी करता न आल्याने अपघात घडतात. अशा हजारो अपघातातून आजवर हजारो लोक द्रुतगती मार्गावर अतिवेगाच्या कारणाने मृत पावले आहेत. दुसरीकडे वाहनांच्या अतिवेगामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से ते खालापूर टोल नाक्यापर्यंतचा परिसर हा जंगलांनी वेढलेला आहे. डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर याठिकाणी अनकेदा रस्ते अपघातात वन्यजीवांचा आपला जीव गमवावा लागला आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अधिक आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाकडून, आयआरबी आणि वनविभागाने परिसरात द्रुतगती मार्गावर जनावरे व इतर प्राण्यांनी प्रवेश करु नये, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कुंपण घातली आहेत.
असे असूनही भेकर, बिबट्या, हरिण यासारखे उंच उडी मारणारे प्राणी रस्ता चुकल्याने किंवा भक्ष्याच्या शोधात रात्री कुंपणावरुन उडी मारुन थेट द्रुतगती मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी द्रुतगती मार्गावरून जोराने जाणारी वाहनांची धडक या वन्यप्राण्यांना बसते, त्यातून अपघात होऊन वन्यप्राणी आपला जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. अनेकदा संबंधित वाहनांचाही भीषण अपघात होऊन प्रवाशांना इजा होते. प्राप्त माहितीनुसार गेल्या अडीच दशकात येथे तीन बिबटे, दोन तरस, तीन भेकरांसह अनेक ससे व इतर छोट्या प्राण्यांचा मृत्यू झाला होता.
जंगल भागात वाहनांचा वेग कमी करावा
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांचा वाढीव वेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्ग असला तरीही जंगल भागातून जाताना वाहनचालकांनी वाहनाचा वेग कमी करावा. रस्त्यालगत प्राणी दिसल्यास हॉर्न वाजवावे, असे आवाहन वडगाव मावळ वन विभागाकडून करण्यात आले आहे.