महापालिका प्रशासनाकडून निर्णय; गरजूंना देण्यास साहित्यच नाही
पुणे – शहरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेला महापालिकेचा मदत कक्ष बंद होण्याच्या मार्गावर आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू आणि ज्येष्ठांना अन्नधान्य कीट तसेच औषधांची मदत दिली जात होती. ही सर्व मदत स्वयंसेवी संस्था तसेच दानशूर व्यक्ती महापालिकेस देत होत्या. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच, या कक्षास मिळणारी मदत बंद झाली आहे. त्यामुळे पुढे मदत देण्यात अडचणी येत असल्याने हा कक्षच बंद केला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी अद्यापही समाजातील काही वर्ग अडचणीत आहे. त्यामुळे “मदत कक्ष’ सुरू राहणे गरजेचे होते.
महापालिकेकडून शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महापालिका हद्दीत असलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगासाठी समाज विकास विभागाच्या माध्यमातून मदत कक्षाची स्थापना केली होती. या कक्षाच्या माध्यमातून ज्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना अन्नधान्याची मदत हवी होती त्यांना ती घरपोच दिली जात होती. तसेच, महापालिकेने आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून सुमारे 8 हजार दिव्यांग तसेच ज्येष्ठांना धान्याचे कीट, औषधे दिली आहेत.
दरम्यान, ही मदत महापालिका देत असली तरी, पालिकेकडून स्वयंसेवी तसेच दानशूर व्यक्तींना आवाहन करून ही मदत संकलित केली जात होती. तसेच, पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनीही कीटच्या स्वरूपात ही मदत या विभागाकडे दिली होती. मात्र, आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल होऊ लागल्याने दुकाने तसेच व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांकडून महापालिकेस देण्यात येणारी मदत थांबली आहे. आता मदतीसाठी फोन आले तरी त्यांना देण्यासाठी पालिकेकडे साहित्य नाही, तसेच या कक्षाच्या माध्यमातून मदतीचा गैरफायदाही घेतला जात आहे.