भोर -लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे भोर तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे कष्टकरी, आदिवासी आणि मोलमजूरी करणाऱ्यांचे हाल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे स्थित पण वीसगाव खोऱ्यातील तरुण उद्योजक अनिल सावले यांनी पडत्याकाळात गोरगरिबांना केलेली मदत ही लाख मोलाची आहे, असे प्रतिपादन भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
वीसगाव खोऱ्यातील नेरे, आंबाडे, बालवडी, खानापूर, गोकवडी आदी गांवातील 250 गरजूंना जीवनाश्यक साहित्याचे कीट आमदार थोपटे यांचे हस्ते वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक अनिल सावले, राजगड साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव थोपटे, यांच्यासह वीसगाव खोऱ्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, नेरे येथे दोन करोनाबाधीत रुग्ण आढळले होते, त्यांनी करोनावार मात केली असल्याने गाव करोनामुक्त झाले आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील 5 हजारांपेक्षा अधिक गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला आहे. समाजातील अनेक सेवाभावी संस्थांनी मदत करुन गरीबांना मोलाचे सहकार्य केले आहे. शासनही आपल्यापरीने मदत करीत आहे. आजच्या पडत्या जीवन शैलीत अनिल सावले यांनी केलेल्या मदतीप्रमाणेच समाजातील दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.