होय, दोन वेळचे अन्न मिळण्यासाठी आई-वडिलांस आळंदीत सोडले

व्हिडिओ व्हायरल झालेल्या ‘त्या’ रिक्षाचालकाची हृदयद्रावक कहाणी

पुणे – “होय! मी आईवडिलांना आळंदीत सोडायला गेलो होतो. पण, त्यांचा सांभाळ करायचा नव्हता म्हणून नव्हे, तर त्यांना काही दिवसांसाठी किमान दोन वेळचे जेवण मिळेल या अपेक्षेने,’ अशी भावना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेल्या पुण्यतील रिक्षा चालकाने व्यक्त केली आहे.

 

 

“लहाणपणी ज्या आईवडिलांनी कष्टाने सांभाळ केला, तोच मुलगा आई-वडिलांना आळंदीत सोडायला निघाला’ अशा शब्दांत एका व्हायरल व्हिडिओद्वारे या रिक्षाचालकाची क्लिप व्हायरल झाली. बिकट परिस्थितीत घर चालवणाऱ्या संबंधित रिक्षाचालकाच्या घरी आठ सदस्य आहेत. तसेच लॉकडाउनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. हप्ते भरण्यासाठी पैसे नव्हते आणि उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नाही. अशातच फायनान्स कंपनीने रिक्षा नेली. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिकच खालावली. त्यामुळे आई-वडिल भिक्षा मागू लागले. मात्र, ते रिक्षा स्टॅन्डवर बसून भिक्षा मागत होते. तेथे या रिक्षाचालकाचे बरेच मित्र असतात. त्यामुळे “आई-वडिलांनी त्या ठिकाणी भिक्षा मागू नये,’ असे या रिक्षा चालकाने वारंवार सांगूनही ते त्याच ठिकाणी भिक्षा मागत.

 

 

त्यामुळे “आई-वडिलांना आळंदीत सोडले, तर तेथे ते भिक्षा मागून दोन वेळचे जेवण मिळवू शकतील’ असा विचार करत रिक्षाचालकाने आई-वडिलांना काही दिवसांसाठी आळंदीला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथील नागरिकांनी व्हिडिओ तयार केला आणि तो व्हायरल केला गेला,’ असे रिक्षा चालकाचे म्हणणे आहे.

 

 

या व्हिडिओबाबत संघटनेला माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या रिक्षा चालकाशी संपर्क साधला. त्याचे म्हणणे ऐकून घेत त्याचे प्रबोधन केले. फायनान्स कंपनीने नेलेली रिक्षा पुन्हा आणून देण्यात आली. तसेच रिक्षाचालकाची दुसरी बाजू सोशल मीडियातून नागरिकांसमोर आणल्यानंतर त्याला मदतीचा ओघ सुरू झाला.

–  केशव क्षीरसागर, बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य संघटना

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.