21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड

करोनाकाळात पुण्यात पहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी

पुणे – करोना संसर्गच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक आजही भीतीच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थितीत करोना काळातील पहिले हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. ब्रेनडेड झालेल्या 21 वर्षीय तरुणीच्या अवयव दानामुळे पुण्यातील 49 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले आहे.

 

मेंदूतील नसांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने एका तरुणीला ब्रेन स्ट्रोक आला. उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात ती ब्रेनडेड झाली. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशनानंतर तिच्या नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली. दात्याच्या शरीरातून हृदय काढण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि.26) पहाटे सुरू झाली. त्यानंतर हे हृदय पुण्यातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरने नेण्यात आले.

 

प्रत्यारोपण प्रक्रिया सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण झाली. याबाबत अधिक माहिती देताना हृदय प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, “49 वर्षीय महिला मांजरी येथील रहिवासी असून डायलेटेड कार्डिओ मायोपथी या हृदयाच्या स्नायूंच्या आजाराने ग्रस्त होत्या. याचे निदान हृदययरोग तज्ज्ञ डॉ. सुनील साठे यांनी केले.’

 

या महिलेला हृदय निकामी होण्याची गंभीर समस्या गेल्या वर्षी अनेक वेळा उद्भवली आणि श्वसनाचा त्रासदेखील होत होता. त्यानंतर प्रत्यारोपणासाठी डॉ. सुनील साठे यांनी डॉ. दुराईराज यांच्याकडे पाठवले. रुग्णाच्या हृदयाचे कार्य फक्त 15 टक्क्यांवर आले होते.

 

ही शस्त्रक्रिया डॉ. मनोज दुराईराज आणि डॉ. राजेश कौशिष यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, डॉ. सुहास सोनावणे, डॉ. सौरभ बोकिल, डॉ. प्रीती अदाते, पर्फ्यूशनिस्ट प्रशांत धुमाळ, अमर जाधव, सम्राट बागल, प्रत्यारोपण हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया पालिमकर, डॉ. भिसे, डॉ. देशमुख, डॉ. पळशीकर, समन्वयक डॉ. स्वाती निकम, शिल्पा महाजन, मुकेश अडेली यांचा टीमच्या मदतीने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.