नवी दिल्ली : राज्यात काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा नेते मनोज जरांगे हे देखील आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आरक्षणाची न्यायालयीन लढाई सुरू असून मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काय निर्णय येतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
मराठा समन्वयक विनोद पाटील यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना विनोद पाटील म्हणाले, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर माझ्या आणि राज्य सरकारच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. यावर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. पण न्याय अद्याप मिळालेला नाही. 11 सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल.
सरकारने प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल. कारण त्यांना कल्पना आहे, माहिती आहे की, न्यायालयात कधीकधी कशाप्रकारे जावे लागते. त्यांनी ते करावे, अशी अपेक्षा मला आणि समाजाला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुनर्विचार याचिकेवर 24 जानेवारी 2024 रोजी सुनावणी होणार होती. त्यानंतर याचिकेवर विचार करण्यासाठी नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालात मराठा समाजाला दिलासा मिळतो का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.