पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेचे शहरातील एकमेव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कमला नेहरू हॉस्पिटल आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, या इमारतीच्या पार्किंगमध्ये ड्रेनेज लाइनमधून मैलापाणी मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. तसेच, येथील अस्वच्छता, त्यामुळे तत्काळ कार्यवाही केली नाही तर येथील घाणपाणी आयुक्तांच्या केबिनमध्ये ओतण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने नुकतीच कमला नेहरु रुग्णालयाच्या झालेल्या दुरवस्थेची पाहणी केली. यावेळी शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महासचिव सतीश यादव, उपाध्यक्ष अनिल कोंढाळकर, मीडिया सहसंयोजक निरंजन अडागळे, युवा आघाडी सहसचिव अॅड. गुणाजी मोरे, शंकर थोरात, बालाजी कंठेकर उपस्थित होते.
यावेळी जगदाळे यांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.
झिका, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची खूप मोठी भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन काही जीवितहानी झाल्यावर जागी होणार का? हा प्रश्न निरंजन अडागळे आणि अॅड. गुणाजी मोरे यांनी व्यक्त केले.
बेसमेंटमध्ये साचतेय पावसाचे पाणी…
ड्रेनेज लाइनमधून बाहेर पडणारे मैलापाणी हे बेसमेंटमध्ये जमा होत आहे. त्याचा निचरा होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, हॉस्पिटलच्या नवीन इमारतीतील बेसमेंटमध्ये दुर्गंधी तसेच डासांची पैदास वाढली आहे.
याचा परिणाम रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. अशातच पावसाचे पाणी देखील या बेसमेंटमध्ये साठले जात आहे. हे पाणी काढण्यासाठी पंपाचा वापर करावा लागत असून चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.