लाहोर – विश्वचषक स्पर्धेतील साखळी गटातच पराभूत होणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांची गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्यासह संघाच्या सर्वच सपोर्ट स्टाफमध्ये बदल केला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मंडळाच्या कार्यकारिणीची येथे बैठक झाली. त्यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आर्थर यांच्याबरोबरच फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर, गोलंदाजीचे प्रशिक्षक अजहर मेहमूद व तंदुरूस्तीचे प्रशिक्षक ग्रॅंट ल्युडेन यांनाही जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ग्रॅंट ब्रॅडबर्न यांना मात्र पदावर कायम ठेवण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आर्थर यांची सविस्तर चौकशी करण्यात आली. पाकिस्तानच्या पराभवाबाबत त्यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला होता. त्यावर चर्चा झाली. ब्रॅडबर्न यांचा अपवाद वगळता अन्य सर्व प्रशिक्षकांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
ब्रॅडबर्न यांच्याबरोबर करण्यात आलेल्या कराराची मुदत 2021 मध्ये संपत असल्यामुळेच त्यांना पदावरून दूर करण्यात आलेले नाही. पाकिस्तानच्या निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ खेळाडू इंजमाम उल हक यांची मुदत जुलै महिन्यात संपली आहे. त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचे संकेत होते. मात्र इंजमाम यांनीच स्वत:हून पुन्हा ही जबाबदारी घ्यायची नाही असे ठरविले आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकासह विविध सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीबरोबरच निवड समितीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
आर्थर यांनी मे 2016 मध्ये पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानने इंग्लंडविरूद्ध टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली. त्यामुळे टी-20 च्या जागतिक क्रमवारीत त्यांनी अव्वल स्थान घेतले. तसेच त्यांनी कसोटी क्रमवारीतही अग्रस्थानावर झेप घेतली होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानला निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. त्यांना श्रीलंकेविरूद्धच्या दोन सामन्यांसह अकरा सामने गमावले. आर्थर यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानने 10 कसोटी सामने जिंकले तर 17 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला.