पिंपरी – शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच मृतांमध्येही वाढ होत आहे. असे असताना महापालिका प्रशासन मात्र आकडेवारी लपविण्याचा खटाटोप करत आहे. सोमवारी पुन्हा करोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आतमध्ये गुंडाळण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
महापालिकेकडून रोजच्या करोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी केली जात आहे. आज महापालिकेच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर 6 वाजून 21 मिनिटांनी एकूण रुग्णसंख्या 1878 दाखविण्यात आली होती. तर आजचे पॉझिटिव्ह म्हणून 96 रुग्ण दाखवले होते. हीच आकडेवारी 7 वाजून 30 मिनिटांनी एकूण संख्या 1881 व आजचे पॉझिटिव्ह 99 दाखवले होते. तर आठ वाजता डॅशबोर्डवर एकूण रुग्ण 1897 झाले आणि आजचे पॉझिटिव्ह 115 रुग्ण दर्शविण्यात आले.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सदरची आकडेवारी वॉररुममधून सायंकाळी सात वाजता मिळालेल्या मेलच्या आधारे घेण्यात आली आहे. दुसरीकडे डॅशबोर्डवर मात्र सायंकाळी साडे सहा वाजताच पॉझिटिव्ह रुग्ण 96 होते तर एकूण रुग्ण 1878 होते. रविवारी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये एकूण रुग्णसंख्या 1768 इतकी होती. यानुसार साडे सहा वाजताच आजच्या करोनाबाधितांचा आकडा शंभरच्या पुढे गेला होता.
पत्रकात 7 वाजेपर्यंत उपलब्ध असलेली आकडेवारी दिली जाते. त्यानंतर डॅशबोर्डवरील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत जाते. दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा रात्री 12 वाजेपर्यंत दाखवला जातो. त्यानंतर 12 वाजता तो आकडा पुन्हा शून्य होतो. म्हणजेच दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने रुग्ण मोजण्यास सुरुवात होते. मात्र सात वाजल्यानंतर येणारा आकडा हा रोजच्या आकडेवारीमध्ये येत नाही. महापालिका प्रशासनाकडून जाणूनबुजून रोजचा एकूण आकडा लपविण्यासाठी असा प्रकार केला जातो. प्रेसनोटनुसार सोमवारी शहरातील 94 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
“करोना’चे चार बळी
गेल्या काही दिवसांपासून रोज “करोना’ शहरातील रुग्णांचे प्राण हिरावून घेत आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल चार जणांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये शहरातील दोन शहराबाहेरील दोन जणांचा समावेश आहे. शहरातील संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी व दापोडी येथील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहराबाहेरील बोपोडी येथील 70 वर्षीय महिला व मुळानगर खडकी येथील 79 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.