” #मोदी_परत_जा’ हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेण्ड

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिला प्रचार दौरा पार पडला. मात्र ट्‌विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड विरोध पाहायला मिळत आहे. “#मोदी_परत_जा’ हा हॅशटॅग ट्‌विटरवर देशभरात ट्रेण्ड होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येऊनही कलम 370, चांद्रयान, पाकिस्तान अशा मुद्द्यांवर बोलत आहेत. मात्र शेतकरी, पूर, नोटबंदी, जीएसटी, बरोजगारी, आर्थिक मंदी, अर्थव्यवस्था अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर शब्दही काढत नाहीत, असा नेटकऱ्यांचा आरोप आहे. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग वापरुन जवळपास 31 हजारहून अधिक ट्‌वीट आतापर्यंत करण्यात आले आहेत.

राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर भागात आलेल्या पूर परिस्थितीनंतर सरकारच्या भूमिकेवरुनही अनेक युजर्सने रोष व्यक्त केला आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे होते, असा सवाल युजर्स विचारत आहेत.

राज्यातील शेतकरी आत्महत्यांवर मोदी का बोलत नाहीत. केंद्र सरकारला शेतकऱ्यांपेक्षा काश्‍मीर मुद्दा महत्त्वाचा आहे, असेही नेटिझन्स म्हणत आहेत. दुसरीकडे, भाजपनेही मोदी परत जा या हॅशटॅगला जोरदार उत्तर देत ‘MahaMandateWithModi’ हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. याद्वारे सरकारने केलेली कामे सांगत विरोधकांवर पलटवार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.