नागरिकांचे सुख, आनंद, सुरक्षा हेच आमचे प्राधान्य- चंद्रकांत पाटील

पुणे  – सर्वसामान्य नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता यालाच आमचे प्राधान्य असून, त्यासाठी आम्ही “आनंदी विभाग’ या विषयावर काम करत आहोत. आपल्या राज्याचा “हॅपिनेस इंडेक्‍स’ सर्वोच्च ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नवचैतन्य हास्य क्‍लब, पुणे यांच्यावतीने आशीष गार्डन येथे आयोजित हास्य योग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, शाम देशपांडे, हास्य क्‍लबचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, रामानुजदास मणियार, सुनील देशपांडे, जयंत दशपुत्रे, संदीप खर्डेकर यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील प्रत्येक व्यक्ती सुख आणि आनंदासाठी धडपडत आहे.

महायुती सरकारचे गेल्या पाच वर्षांत राज्यातील ग्रामीण जनतेचं आयुष्य सुखी, समाधानी होण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे ग्रामीण शहरी भागातील जनता आज समाधान व्यक्त करत असल्याचे पाटील म्हणाले.
तर, खासदार बापट म्हणाले, आयुष्यात सुखासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत जे काम केलं आहे, त्यावर समाजातील प्रत्येक घटक आज समाधान व्यक्त करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचा विश्‍वास असाच कायम राहिल.

कोथरूडच्या वाड्या-वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार
कोथरूडला अद्ययावत नागरी सुविधा पुरवण्यावर सरकारचे प्राधान्य असेल. त्यामध्ये येथील वाड्या-वस्त्याचा चेहरामोहरा बदलण्यावर आम्ही भर देऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आयोजित पदयात्रेवेळी सांगितले. यावेळी फटाक्‍याच्या आतषबाजीत आणि औक्षण करून पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

किनारा हॉटेल येथून सुरू झालेली पदयात्रा दक्षिण मारुती मंदिर, म्हातोबानगर, सिव्हील क्रिस्ट, समर्थ कॉलनी, सुतारदरा, शिवकल्याणनगर, एकता सोसायटी, सुनीता पार्क, शिवतीर्थ गणपती मंदिर, रोहन कॉर्नर, तिरंगा मित्रमंडळ चौक, जयभवानी नगर, समाजसुधारक मंडळ, पुष्प नगरी, सरस्वती हाइट्‌स, खंडोबा माळ, रामबाग विकास मंडळ या परिसरातून श्रीराम हाइट्‌स येथे समारोप झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.