साताऱ्यातील अतिक्रमणांवर आज पडणार हातोडा

मुख्याधिकाऱ्यांकडून 15 जणांच्या टास्क फोर्सची स्थापना
सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहराच्या पाच विकास आराखड्यांना ग्रहण लावणारी अतिक्रमणे पालिकेच्या रडारवर आहेत. अनधिकृत टपऱ्या व अन्य अतिक्रमणांच्या आडून दलाली करणाऱ्यांकडून येणारा दबाव झुगारून पालिकेकडून कारवाईची अपेक्षा आहे. शहरात उद्या, दि. 17 पासून सुरू होणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी मुख्याधिकारी शंकर गोरे 15 अधिकाऱ्यांची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

सातारा पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील वाढती अतिक्रमणे व बंद टपऱ्यांच्या विषयावर बराच गदारोळ झाला होता. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शहरातील अतिक्रमण मोहीम दि. 17 पासून सुरू होईल, असे सांगत वेळ मारून नेली होती. मात्र, साताऱ्यात अशा मोहिमा राजकीय दबावामुळे केवळ फार्स ठरतात, असा सातारकरांचा अनुभव आहे. त्यामुळे या अतिक्रमण हटाव मोहिमेचे नेतृत्व स्वतः मुख्याधिकारी करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण गोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा शब्द अशोक मोने यांना सभागृहात दिला होता. त्यामुळे पालिकेला उद्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणे क्रमप्राप्त आहे.

शहरात रस्ते आणि फुटपाथवर अतिक्रमणे बोकाळली आहेत. पोलीस, पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी वाढत्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्याने शहर बकाल होत आहे. वाढत्या अतिक्रमणाबाबत खासदार, आमदारही भूमिका स्पष्ट करत नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी साताऱ्याची ओळख पेन्शनरांचे शहर अशी होती. आता “टपऱ्या आणि टपोरांचे शहर’, अशी नवी ओळख होऊ पहात आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या अतिक्रमणांकडे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

“स्वच्छ भारत’ मोहिमेत अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
“स्वच्छ भारत’ अभियानात पालिकेने भाग घेतला होता. मात्र, नागरिक सोडाच, अनेक नगरसेवकांनाही या अभियानाची कल्पना नव्हती. सातारा स्वच्छ, सुंदर भासविण्यासाठी पालिकेने दोन महिने कष्ट घेतले. शहरातील सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर नागरिकांसाठी स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले. स्वच्छता अभियानाच्या घोषवाक्‍यांनी भिंती रंगविण्यात आल्या. यावर पालिकेने लाखो रुपयांचा चुराडा केला. मात्र, ज्या भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगवले, त्याच भिंतीच्या पुढे टपऱ्या थाटल्याने ही घोषवाक्‍ये लपली आहेत. पोवई नाक्‍यावर सभापती निवास ते तहसीलदार कार्यालय या रस्त्यावरील फूटपाथवर टपऱ्या टाकण्यात आल्याने हा परिसर पुन्हा बकाल झाला आहे. या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने सातारकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता नव्या वर्षात होणारी ही पहिलीच मोहीम “फार्स’ ठरणार का, याची चिंता साताकरांना आहे.

भाऊसाहेब पाटलांकडे मोहिमेचे नेतृत्व
अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी बांधकाम, शहर विकास व आरोग्य या विभागांमधील 15 जणांचे पथक बनवले आहे. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्याकडे मोहिमेचे नेतृत्व आहे. प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांचाही या पथकात समावेश आहे. नगररचनाकार अनिल पाटील व सहाय्यक नगररचनाकारांनाही सतर्क राहण्याच्या सूचना आहेत.

अतिक्रमणांना राजकीय अभय
पालिकेने सहा महिन्यांपूर्वी पोलीस फौजफाटा घेऊन पोवई नाक्‍यावरील अतिक्रमणे काढली. काहीनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. मात्र, त्याच रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत. पोवई नाका ते मोळाचा ओढा रस्त्याचे चौपदरीकरण झाले. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटपाथ करण्यात आले आहेत. मात्र, फूटपाथवर मोळाचा ओढा ते पोवई नाक्‍यापर्यंत टपऱ्यांची अतिक्रमणे झाली आहेत. याबाबत खासदार, आमदार ठोस भूमिका घेत नसल्याने या अतिक्रमणांना राजकीय अभय असल्याची चर्चा आहे.

पालिकेला खमक्‍या अधिकारी हवा
शहरात रस्ते तसेच असून वाहनांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर अतिक्रमणे वाढत चालल्याने वाहतूक कोंडी होत आहे. प्रसारमाध्यमांमधून टीकेची झोड उठली की, पालिका प्रशासन दिखाव्यासाठी जुजबी कारवाई करते. सातारकर कमनशिबी आहेत. पालिकेला खमक्‍या मुख्याधिकारी मिळत नसल्याने अतिक्रमणधारकांचे फावले आहे. सातारला तसा मुख्याधिकारी मिळायला हवा पण सातारकरांचे नशीबच फुटकं म्हणावे लागेल. सातारची पेन्शनरांचे शहर अशी ओळख होती. आता फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे “टपऱ्यां’चा आणि टपोऱ्यांचा’ सातारा शहर अशी ओळख निर्माण होवू लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.