पिंपरीमध्ये हातोडा चाललाच नाही

अनधिकृत बांधकामांमध्ये भर ः “लॉकडाऊन’मुळे कारवाई रखडली
पिंपरी (प्रतिनिधी) –
अनधिकृत बांधकामांचे शहर अशी ओळख होऊ पाहत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनच्या सहा महिन्यांत केवळ एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळातील निर्बंध लक्षात घेता, उपलब्ध होणारे पोलीस बळ, साधनसामग्री आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कारवाई रखडली आहे. अनलॉकनंतरही या कारवाईत फारशी गती येईल, अशी परिस्थिती नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात ऑन रेकॉर्ड 66 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे. तर शहरातील अनधिकृत बांधकामे एक लाखापेक्षा अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतील बीट निरिक्षकांच्या अहवालानंतर अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची आखणी केली जाते. त्यानुसार या कारवाईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रामुख्याने पोलीस बंदोबस्त, बांधकाम पाडण्यासाठी आवश्‍यक साधने, मनुष्यबळ याची जुळणी करुन ही कारवाई केली जाते. दर महिन्याला शहरातील सरासरी दहा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते.

दरम्यान, 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर महापालिकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण घटल्याने, मनुष्यबळाची कमतरता भासू लागली. आतापर्यंत महापालिकेतील 150 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर बेशिस्त नागरिकांना रोखण्यासाठी, नाकाबंदीबरोबरच दंडात्मक कारवाईसाठी अद्यापही शहरातील पोलीस बळाचा वापर केला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय या कारवाईकरिता आवश्‍यक असलेली पोकलॅन, जेसीबी यांसारखी मोठी यंत्रे चालविणारे कामगारदेखील उपलब्ध होत नसल्याने कारवाईला ब्रेक लागला आहे.

मोठ्या प्रमाणात वाढली अवैध बांधकामे
लॉकडाउनचा गैरफायदा घेत, नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. विशेषतः उपनगरांच्या गल्लीबोळांमध्ये लॉकडाऊनपूर्वी एक मजली असलेल्या लहान-लहान घरांवरही दोन ते तीन मजले वाढले आहेत. महापालिकेला कारवाईसाठी मनुष्यबळ मिळत नव्हते. परंतु बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना मात्र लॉकडाऊनच्या काळातही मजले वाढविण्यासाठी मनुष्यबळ मिळाले. अनलॉक प्रक्रियेदरम्यान परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या सर्व बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात महापालिका मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त व अन्य साधन सामग्रींचा पुरवठा होत नसल्याने कारवाईला काही मर्यादा आल्या आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन येणाऱ्या सूचनांनंतर याचा आढावा घेतला जाईल.
– विजय भोजने, उपअभियंता तथा प्रवक्‍ता

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.