सवय काही जाईना! शिवसेनेत प्रवेश करताना नगरसेवक म्हणाले, “मी आज भाजपात प्रवेश करतोय”; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षरणनीती आखताना दिसत आहेत. त्यातच पक्षांतर करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का देण्यात आला असल्याचे दिसत आहे. नगरविकासमंत्री व शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी २२ नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भाजपाचे डोंबिवलीमधील महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांनी हातावर शिवबंधन बंधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदेदेखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान या पक्षप्रवेशामधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पक्षप्रवेशादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना महेश पाटील यांनी चुकून भाजपात प्रवेश करत असल्याचं म्हटलं आणि एकनाथ शिंदेंसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

“श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामं सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे भारावून जाऊन मी स्वत: आणि माझे अनेक सहकारी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे,” असं महेश पाटील यावेळी म्हणाले. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेना अशी आठवण करुन दिली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महेश पाटील यांनी नंतर चूक सुधारत माफ करा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हटले. मात्र यावेळी महेश पाटील यांनाही हसू आवरत नव्हते. सवय सुटत नाही सांगत तेदेखील हसत होते. तर त्यांच्या मागे बसलेले एकनाथ शिंदेदेखील हसत होते.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे आवाहन केले. तसेच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षात आलेले कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपाच्या माजी तीन नगरसेवकांसोबतच माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे, मनसे पदाधिकारी सुभाष पाटील, रवी म्हात्रे, विजय बाकोडे, सुजित नलावडे, पंढरीनाथ म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, राजाराम म्हात्रे, देवा माने, मोहन पुंडलिक म्हात्रे, हनुमंत ठोंबरे, विक्की हिंगे, उज्ज्वला काळोखे आणि इतर कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.