फुगेवाडीतील प्रकार ः गळके छत, अपुरे कर्मचारी, सुविधांचाही अभाव
पिंपळे गुरव – दवाखान्यातील अपुरी जागा, गळकी इमारत, अपुरे कर्मचारी, नामफलकाचा अभाव आदी सोयी-सुविधांचा अभावामुळे महापालिकेचा फुगेवाडीतील दवाखाना सलाईनवर असल्याचे चित्र आहे.
1981 मध्ये पालिकेने उभारलेल्या इमारतीमध्ये हा दवाखाना सुरू आहे. 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतीमध्ये दवाखाना सुरु असूने इमारतीची पुरती दुर्दशा झाली आहे. एकाही खिडकीला काच नाही. भिंतीवर बुरशीचा थर आहे. फरशा निखळल्या आहेत.
तेथे एक डॉक्टर, एक लिपिक, तीन नर्स, एक फार्मासिस्ट, एक टेक्निशियन, एक मामा व मावशी असे दहा कर्मचारी आहेत. अपुऱ्या जागेमुळे वैद्यकीय साहित्य आडगळीत पडले असून नवीन इंजेक्शन व औषध उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय साहित्य ठेवण्यासाठी व्यवस्था नाही.
दवाखाना पहिल्या मजल्यावर असल्याने गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतार करताना कसरत करावी लागते. पावसाळ्यात इमारतीत पाणी गळती होते. लोखंडी गंजलेल्या कपाटांची रांग बनवून पार्टीशन बनविले आहे. टाईल तुटलेल्या व निखळून पडलेल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छतेसाठी येत नसल्याने अस्वच्छता पसरली आहे.
महिला कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था नाही. आडगळीत उभे राहून अडचणीत कपडे बदलावे लागत आहेत. प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
या संदर्भात आयुक्त राजेश पाटील यांना भेटून समस्या सांगितल्या आहे. कामासंदर्भात पत्र दिले आहे. महिन्यात काम पूर्ण होईल. तोपर्यत दवाखाना मीनाताई ठाकरे या महापालिकेच्या शाळेत सुरू ठेवणार आहे.
– स्वाती काटे, नगरसेविका.
पालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष घालून रुग्णांना उत्तम प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दवाखान्याची स्वच्छता राहण्यासाठी फर्निचर बनवून द्यावे. दवाखान्याला दर्शनी भागात नामफलक लावावा. रुग्णांना बसण्यासाठी
बाकांची अथवा खुर्च्यांची व्यवस्था करावी.
– अक्षय वाजे, फुगेवाडी.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडे इमारत व फर्निचरसाठी पाठपुरावा केला आहे. या दवाखान्याची स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य अधिकारी यांनी पाहणी केली आहे. रुग्ण हे दैवत समजून आमची रुग्णांना मनोमन सेवा द्यायची ईच्छा आहे. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याची गरज आहे.
– डॉ. गोविंद नरके, वैद्यकीय अधिकारी, फुगेवाडी.