संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर कासारवाडी शिवारात, मालपाणी गोडावूनजवळ बुधवारी (15) झालेल्या अपघातातील टेम्पोत सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा गुटखा सापडला असून, याप्रकरणी बीड मधील राजकुमार सपाटे याला संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संगमनेर शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नाशिकहून पुण्याकडे जाणारा टेम्पो (एमएच.04 एचएस.1096 ) वळण घेणाऱ्या रिकाम्या टॅंकरवर धडकून झालेल्या अपघातात चालक विनोदकुमार सोनकर (वय 30, रा. मुंबई, मुळ रा. उत्तरप्रदेश ) ठार झाला होता. अपघातग्रस्त टेम्पोची गुरुवारी तपासणी करताना, त्यात सुगंधी गुटखा आढळून आला. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आदिनाथ बाचकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ, अमृत आढाव, आशिष अरवडे यांनी गुटख्याचा पंचनामा केला असून, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु होते.