लखनौ, – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी समाप्त झाला. आता त्या राज्यात विधानसभेच्या 54 जागांसाठी 7 मार्चला मतदान होईल.
उत्तरप्रदेशसह पाच राज्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांना सामोरी गेली. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये याआधीच मतदान झाले. मणिपूरची मतदान प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. आता उत्तरप्रदेशातील प्रचाराच्या तोफा थंडावल्याने पाच राज्यांत सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराला पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तरप्रदेशात अखेरच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष निकालांकडे लागेल. पाचही राज्यांचे निकाल एकाच दिवशी 10 मार्चला जाहीर होतील. संबंधित विधानसभा निवडणुकांना राजकीयदृष्ट्या मोठे महत्व आहे. देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची रंगीत तालीम म्हणून आताच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी त्या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या पाचपैकी चार राज्यांत भाजपची सत्ता आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आहे. आता संबंधित राज्यांची सत्ता कुणाकडे जाणार ते निकालांतून समोर येईल.