नगर – पालकमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर नगरमध्ये दोनदा हजेरी लावलेले हसन मुश्रीफ तिसऱ्यांदा शुक्रवारी दि.21 नगर शहरात येत असून यावेळी ते राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्याआधी महाविकास आघाडीतील शिवसेना,कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांशी शासकीय विश्रामगृहात एकत्रित खलबते करणार आहेत.
पालकमंत्री सकाळी नगरमध्ये आल्यानंतर आधी महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.यात तिन्ही पक्षांमध्ये सरकारच्या धोरणाविषयी समन्वय असावा यासह विविध शासकीय समित्यांवर कोणत्या पक्षाला किती स्थान असावे यावरही चर्चा करणार आहेत.
राज्य पातळीवर ठरलेल्या धोरणानुसार जिल्हास्तरीय समित्यांवर ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या पक्षाला 60 टक्के तर तालुकास्तरावर आमदार या समित्यांचे अध्यक्ष असतात त्यामुळे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला तालुकापातळीवर 60 टक्के,तर इतर दोन पक्षांना 20-20 टक्के संधी असे धोरण ठरले आहे. त्यामुळेच पालकमंत्री मुश्रीफ आधी तिन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. यात सरकारची भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगून नंतर त्याप्रमाणे नावे मागविण्यात येतील.
या नावांची यादी पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना देतील. राहाता, श्रीगोंदा,पाथर्डी या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्यामुळे इथे तालुकापातळीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नसल्याने या तालुक्यातील कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय समित्यांवर वर्णी लावली जावू शकते.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांशी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यांच्या विकासकामासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. नंतर दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षाची नेते व कार्यकर्ते यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर मुश्रीफ यांचा नगरला हा तिसरा दौरा आहे. पहिल्याच दौऱ्यात त्यांनी मला जिल्हा समजून घ्यावा लागेल असे सांगितले होते.