‘सेवा ऍप’ला वाढतोय प्रतिसाद

दहा महिन्यांत तब्बल 1 लाख 9 हजारांनी मांडल्या तक्रारी

पुणे – शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या “सेवा ऍप’ अर्थात “सर्व्हिस एक्‍सलन्स व्हिक्‍टिम ऍसिस्टन्स ऍप’ला मोठा प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दहा महिन्यांत तब्बल 1 लाख 9 हजार जणांनी विविध पोलीस ठाण्यातंर्गत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी 1 लाख 5 हजार 170 जणांना सेवा कार्यप्रणालीकडून संपर्क करण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नागरिकांचे समाधान झाले, की नाही तपासणीसाठी पोलीस प्रशासनाकडून 62 हजारांवर फोन कॉल्स करण्यात आले. तर उर्वरित फोन विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा दलात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षण देऊन नागरिकांची प्रतिक्रिया घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुनील फुलारी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारीला प्रतिसाद देण्यासाठी संबंधित पोलीस चौक्‍यांसह ठाण्यातून मदत झाली, की नाही हे तपासणीसाठी “सेवा ऍप’च्या माध्यमातून फोन करुन संबंधितांची प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. त्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह तपास अधिकाऱ्यांना तक्रारी बद्दल थेट पोलीस आयुक्तालयातून विचारणा केली जात आहे. त्यामुळे अर्जदारांच्या कामकाजाला गती मिळाली आहे. दरम्यान, असमाधानी अर्जदारांना फोन करुन त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात येत असल्यामुळे तक्रारींचे निवारण होण्यास मदत होत आहे.

विविध तक्रारींनुसार मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामध्ये कौटुंबीक न्यायालय, दिवाणी न्यायालय, महानगरपालिका, महसूल, बांधकाम विभाग, महावितरणच्या तक्रारींबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

फीडबॅकसाठी 160 विद्यार्थ्यांकडून फोनकॉल्स
सेवा ऍपद्वारे दाखल तक्रारींचे निवारण झाले किंवा नाही, याबद्दलची माहिती घेण्यासाठी 160 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी अर्जदारांना फोन करुन पोलीस चौक्‍यांसह ठाण्यातून तक्रारींचा निपटारा झाल्याची प्रतिक्रिया अर्जदारांनी दिल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. दररोज 60 हजार फोन करुन प्रतिक्रिया घेण्यात आली. त्यामध्ये बहुतांश नागरिकांनी “सेवा ऍपमुळे कामकाज झाले,’ असा फीडबॅक दिल्याचे शिवानी मुळे, सोहेल रफीक सय्यद, मयूर चौधरी, वैष्णवी पाटोळे, स्वप्नील पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)