साताऱ्यातील वाढती गर्दी देतेय करोनाला निमंत्रण

सातारा  (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मात्र, सातारा शहरातील नागरिकांना करोनाची कसलीही भीती वाटत नाही. सातारा शहर आणि परिसरात विविध कारणास्तव होणारी गर्दी करोनाला जणू निमंत्रणच देत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होता. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करून मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र गर्दी करू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, विनाकारण घरातून बाहेर पडू नका आदी सूचना देण्यात आल्या होत्या.

लॉकडाऊन शिथिल झाल्याने करोनाचे संकट संपले की काय, असे नागरिकांना वाटू लागले. किराणा, भाजीपाला, कपडे आदी खरेदीसाठी शहर आणि परिसरातील विविध भागांत गर्दी वाढू लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून व्यावसायिक त्यांचा व्यवसाय करत असल्याचे दिसून येत नाही. भाजीपाला खरेदीसाठी करंजे नाका, शाहूपुरी चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, राजवाडा परिसर आदी ठिकानांसह रस्त्यावर जागा मिळेल तिथे भाजी विक्री होत आहे. शहर आणि परिसरात वाढणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन मात्र सध्या काहीच करत नसल्याचे चित्र आहे. करोनाला रोखण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.