पुणे – शहराला एकीकडे पाणीटंचाई, पाणी व्यवस्थापन यासारख्या समस्या भेडसावत असताना शहरातील भूजलाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. गेल्या 9 वर्षांत भूजल उपसा हा दोन टीमसीवरून चार टीएमसी इतका झाला असून, भूजलाचे प्रमाण दुपटीने कमी होत असल्याचा निष्कर्ष एका पाहणीतून समोर आला आहे.
ऍक्वाडॅम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन (सीईई) आणि भूजल अभियान यांच्या वतीने पुणे शहरातील भूजल सद्यस्थिती अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार शहरातील भूजल उपसामध्ये दुपटीने वाढ झाली असून, त्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. पुणे शहरातील भूजल, स्रोत आणि त्याची सद्यस्थिती याबाबत गेल्या 3 वर्षांपासून हा अभ्यास केला जात आहे. यासाठी शहर परिसरातील सुमारे 30 हजार हेक्टरहून अधिक प्रदेशातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यात आला आहे.