वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली गावामध्ये एकाचवेळी जास्त संख्येने गर्दी होऊ नये म्हणून वाघोली ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंधक सनियंत्रण समिती व जीवनावश्यक वस्तू वितरण समितीने अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांसाठी ठराविक वेळेत चालू ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, चिकन, मटन दुकानांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची मुदत असणार आहे.
वाघोली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय योजना व आपत्ती निवारण उपाय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. परदेशातुन आलेल्या प्रवाशांचा १० मार्च पासुन २८ दिवसाचा होम क्वारंटाईन कालावधी संपत आहे. वाघोली गावामध्ये कोरोना पॉजीटीव्ह एकही रुग्ण सापडलेला नाही. वाघोली पुणे शहरालगत असल्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी व जीवनावश्यक वस्तूंसाठी पुणे शहरामध्ये ये जा होत आहे.
पुणे शहरात कोरोना विषाणु फैलाव वेगाने होत असल्याने त्याचे संक्रमण वाघोली कार्यक्षेत्रात होऊ शकते. एकाच वेळी जास्त संख्येने नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणुन ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंधक सनियंत्रण समिती व जीवनश्यक वस्तु वितरण समिती यांनी दुकाने व आवश्यक सेवांसाठी वेळापत्रक केले आहे.
“ग्रामपंचायत प्रशासनाने नियोजित केलेल्या वेळेनुसार नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू व सेवांचा लाभ घेतल्यास कोरोना मुक्त वातावणाचा अनुभव आरोग्य दायक सवयी मध्ये रुपांतरीत होऊ शकतो.यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे”
संदीप सातव ,माजी उपसरपंच, वाघोली ग्रामपंचायत