हिरकणी कक्ष उरले शोभेपुरते 

कोषागार कार्यालयातील हिरकणी कक्ष कुलूपबंद

कबीर बोबडे

नगर – राज्यातील अनेक बस स्थानकात स्तनदा मातांसाठी प्रवासादरम्यान बाळाला स्तनपान करतांना त्रास होऊ नये यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना झाली. शहरातील बस स्थानकातील हिरकणी कक्ष अस्वच्छ असून स्तनदा मातांना बसस्थानकावर बाळाला स्तनपान करण्यासाठी आसरा शोधावा लागतो.

शहरातील माळीवाडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष अडगळीत असल्यामुळे स्तनदा मातांची कुचंबणा होते. हे हिरकणी कक्ष अस्वच्छ असून नियमित स्वच्छता, पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि बस स्थानक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महिलांसाठी तयार केलेल्या हिरकणी कक्षाचा वापर होत नाही. स्तनदा मातांनी हिरकणी कक्षाकडे पाठ फिरवल्याचं दिसतं. हिरकणी कक्षात जाण्यास महिला बिचकतात. हिरकणी कक्षा बाबत महिलांमध्ये उदासिनता पहायला मिळते. शासकीय कार्यालयातील कक्षाच्या बाबतीत हीच अवस्था पाहायला मिळते. शासकीय कार्यालयातील हिरकणी कक्ष कायम बंद असतो. त्यामुळे स्तनदा मातांची गैरसोय होते.

नगर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे बसस्थानके, शासकीय कार्यालय येथे महिलांची कायम वर्दळ असते. कामानिमित्त बऱ्याच महिला शासकीय कार्यालयात येतात. अनेकदा तान्हुल्याला सोबत घेऊन महिला प्रवास करतात. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत लाचलुचपत विभाग, तहसील कार्यालय, विभागीय वनकार्यालय यासारखी अनेक शासकीय कार्यालये आहेत.

या शासकीय इमारतीतील जिल्हा कोषागार कार्यालयातील कक्षावर हिरकणी कक्ष नावाची एक पाटी आहे. इतरत्र कोठेही सूचना, फलक वा जाहिरात लावलेली नाही. यामुळे कामानिमित्त शासकीय कार्यालयातील इमारतीत येणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना हिरकणी कक्षाची माहिती मिळत नाही. महिलांमध्ये जागृती करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. हा हिरकणी कक्ष स्तनदा मातांसाठी उभारण्यात आला. तो कार्यान्वित देखील आहे. परंतु तो कायम कुलुपबंद असतो, चावी ऑफिसमध्ये असते.

माळीवाडा बस स्थानकातील स्तनदा मातांना हिरकणी कक्षा बद्दल विचारले असता, हिरकणी कक्षाबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितलं. बस आगारात ध्वनिक्षेपकावरून केवळ बसेस माहिती दिली जाते. प्रवाशांना इतर काही सूचनाही दिल्या जातात. परंतु; हरकणी कक्षा बाबत एकही उद्घोषणा करण्यात येत नाही.

हिरकणी कक्ष जरी कुलूपबंद असला तरी आमच्याकडे जेव्हा स्तनदा माता येतात, त्यावेळी आम्ही हिरकणी कक्ष त्यांना उघडा करून देतो.

पी. जी. भाकरे अप्पर कोषाधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.