पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाला बाजुला ठेवत वेगळी भूमिका घेतली होती. त्यावर त्यानंतर आज त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं. या सर्व घटनेनंतर वसंत मोरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.
मोरे यांना मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून हटविल्यानंतर साईनाथ संभाजी बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर वसंत मोरे यांनी कुठलीही खंत व्यक्त न करता साईनाथ बाबर यांना ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
मोरे यांनी आपल्या ट्विटवर एक फोटो शेअर करत म्हटलं की, “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई! असं ते यावेळी म्हणाले आहेत.
“अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022
दरम्यान आपण कधीही राज ठाकरे साहेबांवर नाराज होणार नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका लक्षात घेतली तर १५ वर्षे ज्या भागात लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. राज ठाकरेंच्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय, ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याची प्रतिक्रियाही मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.