हुतात्मा उद्यानात विकसित लॉनवर वाढले डोक्‍याइतके उंचीचे गवत

सातारा  – गेंडामाळ नाक्‍यावरील सातारा पालिकेच्या हुतात्मा उद्यानात विकसित केलेल्या लॉनच्या भागात गवत वाढल्याने तेथे संध्याकाळी फिरायला येणाऱ्या महिला व मुलांची अडचण होत आहे. तसेच सकाळी व्यायाम करणाऱ्यांचीही गैरसोय झाली आहे. उद्यानातील गवत कापायचे आश्‍वासन उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिले होते. मात्र, गेल्या महिन्याभरात वृक्ष विभागाकडून काहीही हालचाल झालेली नाही.

शाहूपुरी ग्रामपंचायत व सातारा शहराच्या हद्दीवर असलेले हुतात्मा उद्यान पाच वर्षांपूर्वी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंर्तगत विकसित करण्यात आले होते. या बागेत सिंथेटिक ट्रॅक असल्याने सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने आणि मोकळ्या जागेत शोभिवंत झाडांसह अन्य वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

मात्र, पुरेशा देखभालीअभावी बागेतील मोकळ्या जागेवर उगवलेल्या गवताची छाटणी झालेली नाही. त्यामुळे गवत पाच ते साडेपाच फुटांनी वाढले आहे. गवतात सर्प सहज वास्तव्य करू शकतात. या लॉनवर सायंकाळी मुले खेळत होती. त्यांची खेळण्याची जागा गवताने हिरावून घेतली आहे. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी या वर्षारंभी एका कार्यक्रमानिमित्त उद्यानाला भेट देऊन तेथे फिरायला येणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली होती.

बागेतील गवत तातडीने छाटून घेण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. याबाबत उपनगराध्यक्षांनी वृक्ष विभागाला तातडीने सूचनाही दिल्या होत्या. मात्र, या विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी हुतात्मा उद्यानाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे उपनगराध्यक्षांचे आश्‍वासन कधी पूर्ण होणार असा प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.