प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -“पोपट सारखा शिट्ट्या मारतो, ओरडतो, त्याला तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ठेवो’ असे म्हटल्यामुळे पोपटाच्या मालकाने वृद्ध व्यक्तीला धमकविले. त्यामुळे आजोबांनी थेट खडकी पोलीस ठाणे गाठत संबंधित मालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथील तुळशी मार्केट-महात्मा गांधी वसाहतीत राहणाऱ्या तसेच पोपट पाळणाऱ्या व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने त्यांच्या घरी पोपट पाळला आहे. त्यांचा पोपट वारंवार शिट्ट्या मारणे, ओरडणे असा प्रकार करत असल्याने वृद्ध आजोबांना याचा त्रास होत होता. आजोबांनी त्याबद्दल कैफियत मांडली होती. याच सांगण्यावरून आजोबा आणि समोर राहणाऱ्या व्यक्ती बरोबर त्यांचे वाद झाले. यावेळी पोपटमालक आणि त्याचे साथीदार यांनी तक्रारदार आजोबा यांना शिवीगाळ करत त्यांना मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात दोघांना बोलवून समज देण्यात आली असून पुन्हा वाद न घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आजोबांच्या समोर राहणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या पोपटाचा त्रास आजोबांना होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे देखील त्यांना सांगण्यात आहे.
– दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक खडकी पोलिस ठाणे.