दुधावरील सायीचं नातं

संध्याकाळच्या वेळी ऐन तिन्ही सांजेला काही दुखतखुपत असलं किंवा मन उदास असलं की आपसूक आज्जी आठवते. शाळेतून मलूल चेहऱ्याने परतलं की आज्जी विचारी, बबडी काय दुखतंय. आज दीड फूट लांब वहाणा नाही भिरकावल्यास, काय झालं बाळा? मग दप्तरासकट आजीला बिलगावं आणि आज्जीएव्हढच गहिवरून म्हणावं, मग ती असं काही बोले की ते ऐकत आपण निमूटपणे सारं आवरून हातपाय धुऊन तिच्याजवळ परत कधी येऊन ऐकत बसलो हे कळतही नसे… ती आसन घेऊन देवाजवळ बसे. वाती वळे रामरक्षा म्हणे आपण तिच्या खांद्यावर डोकं ठेवून जवळ बसलो की आपले हात आपल्या हातात घेऊन जोडून देई. निर्माल्यानी दृष्टबिष्ट काढे. तिला विचारले, लागली होती का दृष्ट तर म्हणे दृष्ट बिष्ट काही नसतं आपण चांगले तर जग चांगले बरं… जा भूक लागलीये तुला जांभया येतायत. गरम गरम मेतकूट भात खाऊन घे.

तिला कधी म्हटलं की अमकी मला असं बोलली, मला काही सुचलंच नाही गं…आज्जी म्हणे, मग तू मुळूमुळू रडत आलीस घरी. हे बघ एक तर ताडकन उत्तर द्यावे नाहीतर ते जमत नसेल तर मनास लावून घेऊ नये. ही गोष्ट कधी कळायची तुला? ती हळुवार डोक्‍यावर, पाठीवर, गालावर प्रेमाने हात फिरवी… हात, पाय, पाठ, डोकं चेपून देई… दुधावरच्या सायीचं नातं काय असतं ते नीट कळलं होतं मला. आजही गडद तिन्ही सांजेला आज्जी आठवते. तिची रामरक्षा कानात गुंजत राहाते… श्री राम राम रघुनंदन राम राम… फक्त तिचा प्रेमळ हात पाठीवरून फिरत नाही… उगीचच मलूल उदास वाटत राहातं…

आज खूपच आठवण येतेय आज्जीची. सदाशिव पेठेतल्या टुमदार देखण्या वाड्याची… कुटुंबातील सारेच सख्खेचुलत गुण्यागोविंदाने एकत्र राहात, गोकुळच जणू… श्रीमंत पेशव्यांकडून आंदण मिळालेल्या ह्या वाड्यात एक कोरीव दगडी शिवमंदिर आहे. समोरच्या बाजूला दगडी नंदी. खूप सुंदर मंदिर. आवाज घुमत असल्याने आम्ही आत जाऊन सारखे ओम नमः शिवाय म्हणत असू. रोज पहाटे घंटेच्या मंजुळ स्वरांनी आणि आजोबांच्या धीरगंभीर आवाजाने जाग येई. आजोबा पहाटे उठून पूजा अभिषेक करत. ओम नमः शिवायचा जप आणि शिवमहीन्म स्तोत्राने अभिषेक करत…
वातावरण कसे मंगलमय आणि प्रसन्न सुगंधी होऊन जाई. मी आणि आजी पहाटे जाऊन गोठ्यातून चारावी भरून धारोष्ण दूध आणत असू. आजीने बाग छान फुलवली होती. तुळशीचा वाफा, बेल, बकुळ, शेवगा, आंबा, केळी, नारळाचे देखील झाड लावले होते शिवाय चाफा, जाई, जुई, मोगरा, रातराणी आणि वाड्याच्या आरंभी मुख्य दरवाजावर मधूमालतीचा सुंदर भरगच्च वेल महिरपीप्रमाणे चढवला होता. माझी आजी साक्षात लक्ष्मी, सरस्वती, कालिका आणि अन्नपूर्णा वाटे. प्रसंगानुरूप ही तिची विविध रूपे पाहावयास मिळत.

करारी, स्वाभिमानी, तडफदार तेवढीच प्रेमळ… तिचा रंग पिवळागोरा हळदीसारखा नाकेली, पाणीदार करारी डोळे, काळ्याभोर केसांचा खोपा त्यावर फूल कायम असे, नऊवारी लुगडे आणि कपाळावर कोरून लावलेली लालचुटुक ठसठशीत चंद्रकोर… हिरव्यागार बांगड्या, पाटल्या, बिलवर आणि सर्वात पुढे एक राजवरखी बांगडी, गळ्यात मणिमंगळसूत्र, ठुशी, मोहनमाळ, पायात मोठमोठ्या जोडव्या आणि मासोळ्या अशी माझी आजी… ती अंगाई गाई… जोवरती या कुडीत राही प्राण तोवरी तुज संगोपीन… तद्‌नंतरची नको करू तू चिंता नारायण तुजला त्राता…

अनुराधा पवार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)