अकोले तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा अपहार मुद्दा गाजला

नगर  – अकोले तालुक्‍यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबीतखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अपहाराचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे यांनी या प्रश्‍नावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांना सदस्या सुनिताताई भांगरे,रामहरी कातोरे, उज्ज्वला ठुबे आदी सदस्यांनी साथ दिली. केवळ चौकशी न करता सदर दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी त्यांनी केली.त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी पुढील आठवड्यात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश दिले.

विस्तारअधिकारी रेंगडे यांनी ग्रामसेवकांना हाताशी धरून संगनमताने अपहार केल्याचा आरोप दराडे यांनी केला.या अधिकाऱ्याला जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी का पाठीशी घालत आहे हे अनाकलनीय आहे.कुठलीही चौकशी वा कारवाई केली जात नाही. ग्रामसेवकांनी निलंबीत असताना परस्पर रकमा बॅंक खात्यातून काढून घेतल्या.सतत पाठपुरावा केल्यामुळे यातील दोन ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पारनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविले त्यांनी थातूरमातूर चौकशीचा निव्वळ फ ार्स केला. आमच्यासारख्या सर्वसामान्य सभासदांचा आवाज नेहमी सभागृहात दाबला जातो अशी खंत व आरोपही दराडे यांनी केला. एखाद्या ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायतीमधील मुळ दस्तऐवजामध्ये खोटया बनावट कागदपत्रांचा समावेश करणे हा गुन्हा असल्याने या गुन्ह्यास जबाबदार सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे शासनाचे अध्यादेश आहेत.

यात ज्या प्रकरणाची कोणतीही चौकशी झालेली नाही अशा प्रकरणी संबंधीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रथम प्राथमिक चौकशी करावी.सदरील चौकशी गटविकास अधिकारी यांनी एक महिन्याच्या आत पूर्ण करणे अनिवार्य असते.या चौकशीत काही तथ्य आढळून आल्यास दोषींवर त्यांनी गुन्हे दाखल करावेत. अपहाराची रक्‍कम निश्‍चित करावी. मात्र या गटविकास अधिकाऱ्याने एका महिन्याच्या आत चोैकशी पूर्ण केली नाही तर संबंधीत गटविकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करणे आवश्‍यक असते असा शासन आदेश असताना या अधिकाऱ्यांना प्रशासन व पदाधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप दराडे यांनी केला. त्यावर आठवड्यात या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.