नवी दिल्ली – सरकार आयडीबीआय बॅंकेतील भागभांडवल विकणार आहे. यासाठी निर्गुंतवणुकीचा व्यवहार करण्यासाठी आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी केंद्र सरकारने सल्लागारांना आमंत्रित केले आहे.
मे महिन्यामध्ये या निर्गुंतवणूकिला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिलेली आहे. निर्गुंतवणूक केल्यानंतर आयडीबीआय बॅंकेच्या व्यवस्थापनात बदल होणार आहे. बॅंकेत एलआयसी आणि केंद्र सरकारचे 94 टक्के इतके भांडवल आहे. सल्लागारांना 13 जुलैपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.
आयडीबीआय बॅंकेचे भागभांडवल खरेदी करणाऱ्यांना आयडीबीआय बॅंकेची इत्यंभूत माहिती देण्याची जबाबदारी नव्या सल्लागारावर असणार आहे. 2019 मध्ये एलआयसीने आयडीबीआय बॅंकेचे बरेच भांडवल खरेदी केले होते.
आता आयडीबीआय बॅंकेचे किती भागभांडवल एलआयसी आणि केंद्र सरकार विकणार आहे या संदर्भातील माहिती लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षाच्या आत आयडीबीआय बॅंकेचे खासगीकरण करण्यात येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते.