नवी दिल्ली – लसीकरणाअभावी नाविक क्षेत्र बाधित होता कामा नये, असे सांगून जहाजावर आपल्या निर्धारित कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी नाविकांचे लसीकरण होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे, यावर केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी भर दिला. नाविकांच्या लसीकरणाचा आज मांडविया यांनी आढावा घेतला.
जागतिक नाविक क्षेत्रात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नाविकांच्या कामाचे स्वरूप पाहता, लसीकरण मोहिमेत त्यांना ‘प्राधान्य’ देण्याची मागणी बऱ्याच क्षेत्रातून केली जात आहे.
मंत्रालयाच्या अलीकडील हस्तक्षेपामुळे प्रमुख बंदरांनी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट, कोचीन पोर्ट ट्रस्ट, चेन्नई पोर्ट ट्रस्ट, विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट, कोलकाता पोर्ट ट्रस्ट आणि तूतीकोरिन पोर्ट ट्रस्ट या सहा प्रमुख बंदरांनी आपल्या बंदर रुग्णालयात नाविकांचे लसीकरण सुरू केले आहे.
शिवाय, केरळमध्ये एका खाजगी रुग्णालयातही नाविकांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. याखेरीज मंत्रालय राज्य सरकारांनी त्यांच्या प्राधान्य सूचिमध्ये नाविकांना समाविष्ट करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केरळ, तामिळनाडू आणि गोवा यांनी यापूर्वीच असा समावेश केला आहे.