लोकांचा जीव वाचवण्यासाठी आवश्‍यक ते सगळे सरकार करेल

नवाब मलिक यांनी भाजपवर साधला निशाना

मुंबई – लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. गेल्या वर्षी करोनाचा उद्रेक झाल्यावर लॉकडाऊन करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी कुणाला विचारात घेतले नव्हते आणि पॅकेजही जाहीर केले नव्हते, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

केवळ राजकारण करायचे म्हणून हे करा ते करा बोलणे योग्य नाही. महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु, जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्‍चितपणे सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सेमी लॉकडाऊनची स्थिती आहे. आज दिवसाला 63 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बेड्‌स, ऑक्‍सिजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील जो काही निर्णय असेल तो परिस्थितीचा आढाव घेऊनच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

करोना काळात संपूर्ण देशात जसे लोकांना पैसे देण्यात आले, तसे महाराष्ट्रातही देण्यात आले. मजुरांना 4 महिने दोनवेळेचे जेवण देण्यात आले आहे, असे सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आरोप करत आहेत. पण गुजरातमध्ये काय स्थिती आहे. ते त्यांनी बघा. महाराष्ट्राने चांगले काम केले आहे. उत्तर प्रदेशात तर टेस्टच केल्या जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.