भूमिहीन कुटुंबाला शासनाने पाच एकर जमीन द्यावी; आठवले यांची मागणी

लोणावळा – प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला शासनाने पाच एकर जमिनीचे वाटप करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात पत्रकार परिषदेत केली आहे. लोणावळ्यात एका खासगी कार्यक्रमासाठी आठवले आले होते. या वेळी ते बोलत होते.

आठवले म्हणाले, आमच्या मागणीसाठी आम्ही 25 फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार होतो. मात्र करोनामुळे तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. देशात 20 कोटी एकर जागा मोकळी आहे. या जागेचे वाटप झाल्यास 4 कोटी कुटुंबांना म्हणजेच किमान 20 ते 25 कोटी जनतेच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटणार आहे.

शासनाने याकरिता भूमिहीन नागरिकांची माहिती गोळा करत यादी तयार करावी. शेतीसोबत त्यांनी जोडधंदा केल्यास ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 पर्यंत नागरिकांचे हक्काचे पक्के घर व्हावे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे.

शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करण्याचा तसेच न्याय मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेती सुधारणा कायद्यात बदल करायला तयार आहेत. मात्र शेतकरी कायदेच रद्द करा ह्या मागणीवर आडून बसल्याने त्यावर अजून तोडगा निघालेला नाही असे सांगितले.

पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने त्यावरील कर कमी करावेत, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तर वीज बिलात पन्नास टक्के कपात करावी, अशी मागणी केली असल्याचे स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सरचिटणीस गणेश गायकवाड, मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, कमलशील म्हस्के, यमुना साळवे, संजय अडसुळे, मालन बनसोडे, अशोक सरवदे, राजू देसाई, उषा जाधव, चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.