घोडेबाजार करणाऱ्या सरकारचा फुगा फुटणार

देवेंद्र फडणवीस : इंदापूर येथे कृषी महोत्सवाचा थाटात समारोप

रेडा- इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने भरवलेला घोडेबाजार चांगले घोडे पाहून मनापासून आवडला. परंतु राज्यात सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने घोडेबाजार करून सरकार स्थापन केले आहे. मात्र, हा केलेला घोडेबाजारचा फुगा लवकरच फुटेल, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर कृषी महोत्सव 2020 बक्षीस वितरण व समारोप रविवारी (दि. 12) फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील होते.

ेंयावेळी आमदार राहुल कुल, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, कृष्णाजी यादव, लालासाहेब पवार, माऊली चवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासो शेंडे, पृथ्वीराज जाचक, जालिंदर कामठे, अरविंद वाघ यांच्यासह बाजार समितीचे संचालक व शेतकरी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, अवघ्या दीड हजार मतांनी हर्षवर्धन पाटलांना पराभव स्वीकारावा लागला आहे. जर एवढी मते मिळाली असती तर मी आणि हर्षवर्धन पाटील माजी राहिलो नसतो, असे असले तरीदेखील झालेल्या नुकसानीची भरपाई सर्व मिळून करूया. इंदापूरचे कृषी प्रदर्शन नेत्रदीपक व वैशिष्ट्यपूर्ण सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहे.

इंदापूरच्या घोड्याची ताकत वेगळीच आहे. त्यामुळे घोडे बाजारातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस इंदापूरच्या अश्‍वांनी पटकवले. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे. उत्पादन खर्च वाढत आहे. यासाठी शेतीमध्ये नवे प्रयोग झाले पाहिजेत, यासाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजार समितीने योगदान दिले आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून किमान दीडपट हमीभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरू आहे. उसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे कारखान्याकडे गाळपासाठी गेलेल्या उसाची रक्‍कम मिळण्याचा कायदा अमलात आणण्याची किमया भाजप सरकारने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळू लागला तर कारखाने देखील सुस्थितीत चालू लागले आहेत. परंतु आता शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही.

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सामान्य नागरिकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकमेकात पदासाठी पालकमंत्री यासाठी खुर्चीसाठी बंगल्यासाठी भांडणे सुरू आहेत. ज्यावेळेस यांच्यातील भांडणे कमी होतील. त्याचवेळेस हे सरकार लोकांकडे लक्ष देणार का, असाही सवाल त्यांनी केला. हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री असताना त्यांनी सहकार संदर्भात जे चांगले नियम घालून दिले कायदे केले त्यामुळेच राज्यातील बाजार समित्या सक्षम झाल्या त्यामुळेच आज बाजार समित्या चांगल्या चालत आहेत.आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेल्या मागण्यावर सरकारला जागे केले जाईल, अशीही ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी हर्षवर्धन पाटील, बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. बाजार समितीचे संचालक सचिन भाग्यवंत यांनी आभार मानले.

  • देवेंद्र फडणवीस इंदापुरच्या पाठीशी
    भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. येणारा भविष्यकाळ संघटितपणे राहून पुढे नेऊ या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्दाला पक्‍के आहेत. जो शब्द देतात. तो शब्द खात्रीलायक पाळतात. त्यामुळे मी आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची अधिकची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इंदापूर तालुक्‍यातील जनतेच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.