मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. भाजप पैसा व दारू वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे? महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे ते म्हणाले.
पटोले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, भाजप सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटताना पकडले गेले. त्यानंतर त्यांनी आपण चिठ्ठ्या वाटण्यासाठी गेल्याचा दावा केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस चिठ्ठ्या वाटत असतील तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. यावरून त्यांच्याकडे आता कार्यकर्तेच राहिले नसल्याचे स्पष्ट होते.
आता हे लोक कितीवेळा खोट्यावर खोटे बोलणार? देवेंद्र फडणवीस यांचे पीए तथा आर्वी विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुमीत वानखेडे यांच्या वर्धा येथील गोदामात दारूच्या बाटल्या सापडल्या. वर्धा हा दारुबंदीचा जिल्हा आहे. दारू व पैसा वाटून हे लोक मतदान मागण्यासाठी नोट जिहाद करत आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजप घटनात्मक व्यवस्थेला मानत नाही. काँग्रेस नेहमीच असा आरोप करते. कुणी कुणाला मतदान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण त्याला हे लोक व्होट जिहाद म्हणतात, असेही ते पुढे म्हणाले.
याला ब्राह्मण जिहाद म्हणावा का?
महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने भाजपला मतदान देण्याचा निर्णय घेतला. याला ब्राह्मण जिहाद म्हणता येईल का? काय सुरू आहे महाराष्ट्रात? मतदान हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. त्या अधिकाराचे हनन करता येणार नाही. भाजप आज पैसा व दारू वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. हा नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे? असे नाना पटोले म्हणाले.