देश विकायला निघालेल्या सरकारला पाणी पाजा 

खा. उदयनराजे : कोरेगाव तालुक्‍यात प्रचाराचा झंझावाती दौरा

कोरेगाव – विरोधकांना सत्तेवर येण्यासाठी मते हवी होती. तुमच्या वैचारिक मतांची त्यांना कधीच गरज नव्हती. आम्ही मात्र तुमच्या मत आणि वैचारिक मतांची कदर करतो. सध्या देशातील तरुणांना रोजगार नाहीच. पण ज्यांच्याकडे आहे, त्यांचाही हिस्कावला जातोय. देश विकायला निघालेल्या सरकारला चुना लावून पाणी पाजा. सत्तांतर घडवून देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाऊया. गुजरवाडी खिंडीच्या रस्त्याचा प्रश्‍न निवडणूक संपल्यानंतर विशेष लक्ष घालून सोडवू, असे आश्‍वासन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षांचे सातारा लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोरेगाव तालुक्‍यात प्रचारदौरा झाला. त्यावेळी किन्हई व कुमठे येथे झालेल्या जाहीर सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई फाळके, डॉ. तावरे, पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, काकासाहेब धुमाळ, पंचायत समिती सदस्य डॉ. होळ, श्रीमंत झांजुर्णे, डी. पी. सी. भोसले, शाहूराज फाळके, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संघटक अंकुशराव जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

भाडळे खोऱ्यातील जनतेतून महाराजसाहेबांना विक्रमी मताधिक्‍य मिळेल अशी मला खात्री आहे. भाजपला आपला उमेदवार निवडून येण्याची खात्री नव्हती, म्हणूनच त्यांनी स्वतःची जागा सेनेला सोडली. आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच उदयनराजेचा विजय निश्‍चित झाला आहे, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

भाजप सेनेला ते पुन्हा सत्तेवर येतील का नाही, याची स्वतःलाच खात्री नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची निर्णय घेतला, असा आरोप करून विरोधक कितीही एकत्र आले, तरी उदयनराजेच पुन्हा खासदार होतील, असेही आमदार शिंदे यावेळी म्हणाले. उदयनराजे जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी झटत असतात आणि विरोधक मात्र त्यांची दहशत असल्याचा खोटा प्रचार करतात. मध्यंतरी देऊरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. त्याची माहिती कानांवर पडताच महाराजांनी संबंधित अधिकाऱ्यास एकच फोन केला. तेव्हा त्या अधिकाऱ्याने काहीही करणे न सांगता पाणी सोडले. जनता जनार्दनासाठी महाराजांची ही बांधिलकी व नैतिक दहशत आहे.

भाजपला महाराष्ट्रात उमेदवार मिळाले नाहीत, म्हणून काही ठिकाणी त्यांनी लोकांना विकत घेतले, तर काही ठिकाणी तुमची चौकशी लावू, जिने हराम करू ..अशा धमक्‍या देत व दबाव आणून काही उमेदवारांना त्यांनी त्यांच्या पक्षात घेत उमेदवाऱ्या दिल्या आहेत. मात्र या निवडणुकीत बळीचे आणि तरुणांचे राज्य यावे, यासाठी सर्वांनी महाराजांनाच मते द्या व इतिहास घडावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले

यावेळी उदयनराजेंना विक्रमी मताधिक्‍य देण्याचा निर्धार विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी व्यक्त केला. उदयनराजेंच्या या दौऱ्याने कोरेगाव तालुक्‍यात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी राजेंद्रकाका भोसले, शरदभाऊ भोसले, महादेव भिसे, सुरेखाताई पाटील, धनंजय भोसले, संजय साळुंखे, युवक अध्यक्ष राहूल साबळे, ज्येष्ठ नेते गुलाबभाई इनामदार, धर्मराज जगदाळे, जयवंत पवार, गितांजली कदम, शिवाजीराव साळुंखे, अप्पासाहेब चव्हाण, सुनील साबळे, नामदेवराव चव्हाण, दत्तात्रय घाडगे, रवींद्र माने, आनंदराव माने, शरद भोसले, ऍड. पी.सी. भोसले, ऍड. नितीन भोसले, उपसरपंच संतोष चव्हाण, ऍड.भैयासाहेब जगदाळे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.