दसऱ्याच्या अगोदर नवे पॅकेज जाहीर होणार

गरिबासाठी रोख रक्‍कम चालू राहणार; मोठे पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार 

नवी दिल्ली – सरकार करोनावर लस आल्यानंतर दुसरे पॅकेज जाहीर करण्याची शक्‍यता होती. मात्र, पहिल्या तिमाहीतील विकासदर उणे 23.9 टक्‍क्‍यांवर कोसळल्यानंतर आता दसऱ्याच्या अगोदरच दुसरे पॅकेज जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मार्च महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब कल्याण योजना आणि भारत आत्मनिर्भर योजना सुरू केली होती. आता नव्या पॅकेजमध्ये यापेक्षा अधिक खर्चाची तरतूद असणार आहे. यामध्ये शहरातील रोजगार निर्मितीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्‍यता आहे. काही मोठे पायाभूत प्रकल्प याचवर्षी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

यामुळे बाजारपेठेत पैसा उपलब्ध होईल. त्याचबरोबर रोजगारनिर्मिती होईल. दुसऱ्या पॅकेजमध्ये ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, गरिबासाठीच्या मोफत धान्य आणि रोख मदतीला मुदतवाढ देण्यात येणार आहे.

यासंदर्भात अर्थमंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तमाध्यमांना नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. भारतामध्ये दसऱ्यापासून उत्सवाचा हंगाम सुरू होतो. हा कालावधी ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्याअगोदर सरकार पॅकेज जाहीर करू शकते.

शहरातील पायाभूत सुविधाचे मोठे प्रकल्प याच वर्षी मार्गी लावण्यासाठी मोठी रक्कम उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे शहरात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. लस आल्यानंतर दुसरे पॅकेज जाहीर केले तर उशीर होईल, असे सरकारला वाटते. लस 2019 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्येच हे पॅकेज जाहीर करण्यासाठी हालचाली चालू झाल्या आहेत.

शहरातही रोजगार हमी योजना 

या पॅकेजमध्ये शहरात रोजगार हमी योजनेसारखी रोजगारनिर्मिती करणारी योजना सुरू करण्याबाबत विचारविनिमय चालू आहे. याबाबत विविध मंत्रालये परस्परांशी चर्चा करीत आहेत. यासाठी सुरुवातीला 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. सुरुवातीला जिल्हा आणि तालुका स्तरावरील शहरात अशी योजना सुरू केली जाईल. नंतर ती महानगरापर्यंत विस्तारीत केली जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.