विरोधकांची याचिका याच चोरीच्या कागदपत्रांवर आधारीत
सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
नवी दिल्ली – राफेल व्यवहाराच्या संबंधातील महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली असून याच कागदपत्रांच्या आधारे राफेल कराराला आव्हान दिले जात आहे असा दावा आज केंद्र सरकारच्यावतीने सुप्रिम कोर्टात करण्यात आला आहे. केवळ वृत्तपत्रीय माहितीच्या आधारे यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण आणि अरूण शौरी यांनी राफेल प्रकरणात फेर सुनावणीची याचिका केली असून ही याचिका स्वीकारू नये अशी विनंतीहीं सरकारच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने या आधीच निकाल दिला आहे पण या निकालाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका सिन्हा, शौरी आणि प्रशांत भुषण यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी आज सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे झाली. त्यावेळी सरकारच्या वतीने राफेल प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. त्यातील माहितीच्या आधारेच विरोधकांनी ही फेरविचारांची याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायालयाने विश्वास ठेऊ नये अशी विनंती सरकारच्यावतीने करण्यात आली. द इंग्रजी दैनिकात राफेल प्रकरणातील अनेक स्फोटक तपशील देण्यात आले आहेत. या कडे याचिकाकर्त्यांच्यावतीने कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले. पण वृत्तपत्रीय माहितीवर आधारीत कोणताहीं निर्णय घेतला जाऊ नये असा आग्रह पुन्हा सरकारी बाजूंकडून धरला गेला. सरकारच्यावतीने ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी बाजू मांडली.