घरमालकांवर गुन्हे दाखल करू नयेत
भाडेकरू, मालक यांनी सामंजस्याने प्रश्न सोडवावा : सचिन शिंगवी
पुणे – नवी पेठेतील एका इमारतीत राहणाऱ्या चंद्रपूरमधील विद्यार्थिनीला धमकावून खोली सोडण्यास सांगणाऱ्या घरमालकिणीविरोधात तक्रार आल्यानंतर सोमवारी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस् संघटनेने हा विषय घरमालक आणि भाडेकरू यांच्या सामंजस्याने सोडवण्यात यावा, अशी मागणी पालकमत्र्यांकडे केली आहे.
घरभाड्यासाठी विद्यार्थ्यांना धमकावण्यात येत असल्याच्या तक्रारी डॉ. व्यंकटेशम यांच्याकडे आल्या होत्या. गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर उपायुक्त सिंह यांनी सोमवारी मेधा बोथरा या विद्यार्थिनीबरोबर वैयक्तिक संपर्क साधला. तिची तक्रार त्यांनी ऐकून घेतल्यावर घरमालकिणीविरोधात गुन्हा दाखल केला.
संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, शहरातील ज्येष्ठांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे रितसर घर भाड्याने देणे आणि मिळणाऱ्या भाड्यावर उदरनिर्वाह हे आहे. त्यांनी आयुष्यभराची पुंजी गुंतवून सदनिका घेतल्या आहेत. औषध आणि गरजा भाड्यावरच भागवत असतात. तर, दुसरीकडे नोकरी करणाऱ्या तरुण वर्गाने बॅंकेचे कर्ज काढून सदनिका विकत घेतल्या असून पगारातील पैसे आणि येणारे भाडे यातून हप्ते भरत आहेत.त्याशिवाय, महापालिका कर, लाईट बिल, सदनिका दुरुस्ती असे इतर खर्चसुद्धा त्याला सरकारने माफ केले नाहीत.
तीन महिने भाडे पुढे ढकलण्याच्या गृहनिर्माण विभागाने फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. याचा अर्थ भाडे घेऊ नये, असा होत नाही. तसेच, भाडे घेऊ नये असा म्हणायचा सरकारला अधिकार नाही. कारण होणारा व्यवहार दोन व्यक्तींमधला असून एकतर्फी निर्णयाने दुसऱ्यावर अन्याय होतो.
कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता
या पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यास कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. यामुळे घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हे दाखल न करता दोघांच्या अडचणी समजून घेऊन विषय सामंजस्याने सोडवण्यावर भर द्यावा, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गृहनिर्माण विभागाने एक सूचना जारी केली आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर टाळेबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. बिकट परिस्थितीमुळे अनेकजण भाडे भरू शकत नाहीत. त्यामुळे घरमालकाने सक्तीने भाडे वसूल करू नये, भाडेवसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, अशी लेखी सूचना गृहनिर्माण विभागाने केली होती. आदेश जाहीर झाल्यानंतर भाडेवसुलीसाठी तगादा लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असे आदेशात म्हटले आहे.
– सचिन शिंगवी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस संघटना