सरकारची घटका भरली

खा. उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल

कराड – शेतकऱ्यांबाबत खोटा कळवळा दाखवणाऱ्या सरकारमुळे शेतकऱ्यांमध्ये वेदना घेऊन जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, अशी मानसिकता बनली आहे. या सरकारच्या घटका भरली असून उद्याच्या निवडणूकीत जनता त्यांना घरपोहोच करेल, असा हल्लाबोल श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, ऍड. आनंदराव पाटील-उंडाळकर, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, लोकशाही विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, सभापती हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, मजहर कागदी, नंदकुमार बटाणे, माधवराव पवार, विजयसिंह यादव आदी उपस्थित होते.

देशातील 80 टक्के लोक शेतीवर आधारीत आहेत. त्यांनी तुम्हाला सत्तेवर बसविले. सरकारने त्यांचा भ्रमनिरास केल्याचे स्पष्ट करुन खा. उदयनराजे म्हणाले, देशातील जनता प्रचंड सहनशिल आहे. काही वेळा त्यांचे कौतूकही वाटते. जनतेच्या जीवावर मोठे झालेले लोक मस्तवाल आहेत. या सरकारचे लाड आणि आपल्यावरील अन्याय लोक आजपर्यंत सहन करत आले. परंतू या पुढे असे घडणार नाही. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत जनताच या सरकारला मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही.

वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टिका करताना उदयनराजे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांनी केवळ आडनाव घेतले. परंतु, त्यांनी समाजाला कायम वंचितच ठेवण्याचे काम केले. मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये झालेले निकाल आता लोकसभेच्या निकालानंतर देशभर पहायला मिळतील. त्यामुळे गेल्या 5 वर्षांतील शेतकरी आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. यावेळी केंद्रात परिवर्तन अटळ आहे. या सरकारच्या घटका भरल्या आहेत. त्यांची वेळ संपत आली आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पाच वर्षे घोरण्यात घालवली.

उद्याच्या निवडणूकीत जनता त्यांना घरपोहोच करेल. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, थापा मारुन सत्तेवर आलेल्या सरकारने पाच वर्षे लोकांना केवळ भुलवण्याचे काम केले. एकही चांगला निर्णय या सरकारने घेतला नाही. जे घेतले ते लोकांना अडचणीच्या खाईत लोटणारे होते. आज लोक जीएसटी, नोटाबंदी सारख्या निर्णयांमुळे पिचलेत. त्यामुळे पाच वर्षांत मोदी सरकारच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. येत्या निवडणूकीत या सरकारचे नामोनिशान राहणार नाही, अशी कामगिरी आपल्याला करुन दाखवायची आहे. सभेस कराड पालिकेतील नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.