न्यूयॉर्क : प्राणी माणसासारखे बोलू शकत नाहीत. ते शब्दांद्वारे आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत, परंतु ते आपल्या अभिव्यक्तीद्वारे आपले प्रेम नक्कीच व्यक्त करू शकतात. सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, जे मानव आणि प्राण्यांमधील गाढ प्रेमाचे प्रतीक ठरत आहे. या फोटोत पूर्व कांगोच्या राष्ट्रीय उद्यानात 14 वर्षीय माउंटन गोरिल्ला ‘नादाकासी’ तिच्या केअरटेकर आंद्रे बाउमाच्या कुशीत विसावलेली दिसते. दुर्दैवाने याच पोझमध्ये असताना या गोरील्लाने अखेरचा श्वास घेतल्याने 14 वर्षांपासूनचे मानव -प्राणी बंध तुटले!
* आंद्रेने 14 वर्षांपूर्वी नादाकासीला वाचवले
14 वर्षांपूर्वी सशस्त्र लष्कराने तिच्या आईची हत्या केली तेव्हा नादाकासी (माउंटन गोरिल्ला) फक्त दोन महिन्यांची होती. नादाकासी तिच्या आईच्या मृतदेहाला घट्ट बिलगून बसली होती. तेव्हा विरुंगा रेंजर्स आंद्रे बाउमा यांनी तिला वाचवले आणि तिला आपल्या बाहुत धरून ठेवले, जेणेकरून ती जिवंत राहू शकेल. त्यानंतर नादाकासीला दुसऱ्या गोरिलासह सेन्क्वेक्वे सेंटरमध्ये पाठवण्यात आले, जिथे ही जोडी एकत्र राहत होती, परंतु 26 सप्टेंबर रोजी त्या दुसऱ्या गोरील्लाचा मृत्यू झाला.
नादाकासी अगदी तान्ही होती तेव्हा बाउमाने तिचा जीव वाचविल्यावर त्याला बिलगली होती. योगायोगाने तिने शेवटचा श्वासही बाउमाच्या कुशीतच घेतला. बाउमा म्हणतात की – ‘असे प्रेम लाभणे आणि काळजी घेणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मला अभिमान आहे की नादाकासीने मला तिचा मित्र मानले. मी तिच्यावर माझ्या मुलीसारखे प्रेम केले. आम्ही दोघे खूप बोलायचो. तिची कमतरता माला नेहमीच जाणवेल.’
* सेल्फीमुळे नादाकासी झाली होती लोकप्रिय!
सेल्फी घेतल्यानंतर नादाकासी प्रचंड लोकप्रिय झाली. 2019 मध्ये, पार्क रेंजर मॅथ्यू शामवुने सेनक्वेक्वे सेंटरमध्ये नादाकासी आणि तिच्या सहकारी गोरिल्लांसोबत सेल्फी घेतला. हे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल झाले, त्यानंतर नादाकासी खूप लोकप्रिय झाली होती.