गुड न्यूज : रेमडेसिविरची टंचाई संपणार

येत्या 7 ते 10 दिवसांत पुरेशी उपलब्धता

मुंबई – करोना विरोधाच्या लढ्यात रेमडेसिविर इंजेक्‍शन उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले जाते आहे. मात्र त्याचाच तुटवडा असल्याच्या बातम्या असून राज्याच्या विविध भागांत हे इंजेक्‍शन उपलब्ध नसल्याच्या तक्रारी रूग्णांच्या नातलगांकडून करण्यात आल्या होत्या. कालच मुख्यमंत्र्यांनीही आपल्या बोलण्यात या समस्यांची कबुली दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काहीशी दिलासादायक माहिती देण्यात आली आहे.

येत्या 7 ते 10 दिवसात इंजेक्‍शनचे 10 ते 20 लाख डोस बाजारात उपलब्ध होतील असा दिलासा उत्पादक कंपन्यांनी दिला असून टंचाई निर्माण होण्यामागच्या कारणाचा खुलासाही केला आहे. रेमडेसीवीरची कमतरता निर्माण होण्यामागे केवळ करोना रुग्ण संख्येतील प्रचंड वाढ हे एकमेव कारण नसल्याचे या कंपन्यानी स्पष्ट केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये करोना प्रभाव खुपच ओसरला होता आणि त्यामुळे रेमडेसीवीरची मागणी कमी झाली होती. हे औषध मोठ्या प्रमाणावर उत्पादित करून ठेवता येत नाही कारण त्याची मुदत 6 ते 8 महिने इतकीच आहे. मागणी कमी झाल्याने कंपन्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये उत्पादन कमी केले होते. 

मात्र मार्च पासून करोना केसेस अचानक वाढू लागल्या आणि रेमडेसीवीरची मागणीही. पूर्वी ही मागणी फक्त महानगरे आणि मोठ्या शहरातून होती. आता मात्र छोटी शहरे, गावे, खेडी येथूनही मागणी येत आहे. कंपन्यांचे वितरण जाळे खेडोपाडी, लहान शहरात पुरवठा करण्याइतके सक्षम नसल्याने मागणी नुसार पुरवठा होऊ शकला नाही.

मात्र मार्चच्या मध्यापासून कंपन्यांनी रेमडीसीवीरचे उत्पादन वाढविले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात लाखो डोस बाजारात उपलब्ध होतील. तसेच निर्यात बंदी मुळे देशात या औषध साठ्याच्या स्थितीत सुधार होण्यास मदत झाली आहे. भारतात सहा कंपन्या या औषधाचे उत्पादन करतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.