गोंदवलेत भाविकांची मांदियाळी

गोंदवले – मनी गुरुमाऊलीच्या भेटीची आस अन्‌ मुखी श्रीरामाचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

श्रींच्या समाधी मंदिरात दर पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त समाधी मंदिरात विविध कार्यक्रम सुरु होते. परतणारी आषाढीवारी यामुळे काल दुपार पासूनच भाविकांनी समाधी मंदिरात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. रात्रीपर्यंत समाधी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

मध्यरात्रीपासूनच दर्शनबारीतही भाविकांनी उपस्थिती लावली होती. सकाळी दहाच्या सुमारास दर्शनाच्या रांगा खूप अंतरापर्यंत गेल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत भाविकांच्या रांगा दिसतच होत्या. गुरुपौर्णिमेनिमित्त अखंड पहारा, नामस्मरण, भजन, श्री लिलामृत पारायण, विष्णुसहस्त्रनाम आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. पहाटे काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.सकाळी मुख्य समाधी मंदिरात अनेक भाविक श्रींचा अनुग्रह घेत होते. अभिषेकासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मुख्य सभामंडपात विविध मान्यवरांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गावातून रामदासी भिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर समाधी मंदिरात भाविकांची गर्दी दिसत होती. त्याबरोबरच गावातील विविध मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या सोयीसाठी दहिवडी, फलटण, बारामती, सातारा, कराड आदी ठिकाणाहुन जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.

दरम्यान मुख्य रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होती. मुख्य दोन्ही प्रवेशद्वारावर गर्दी झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये व भाविकांना दर्शनासाठी अडचण येऊ नयेत म्हणून महिला पोलीस जवान तैनात करून दर्शन बारीला जाण्यासाठी मोकळीक ठेवली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेवून दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार भुजबळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.